अबब… महापालिका अधिकाऱ्याकडे ३२ कोटींचे घबाड

0
3
  • तब्बल ८ कोटींची रोकड, २३ कोटींचे सोन्याचे दागिने, हिरे

वसई, दि . १६ ( पीसीबी ) : नालासापोरा येथील अनधिकृत 41 इमारतींच्या घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) बुधवारी 13 ठिकाणी छापे टाकले होते. या प्रकरणाची पाळेमुळे हैदराबादपर्यंत पोहोचली असून ईडीने महापालिका नगररचना उपसंचालक वाय. एस. रेड्डी यांच्या हैदराबादेतील घरावर छापेमारी केली. या छापेमारीत 8 कोटी 6 लाख रुपयांची रोकड आणि 23 कोटी 25 लाख रुपये किमतीचे सोने आणि दागिने जप्त करण्यात आले आहेत.

नालासोपारा येथील अनधिकृत 41 इमारती घोटाळा प्रकरणी ईडी मार्फत सध्या चौकशी करण्यात येत आहे. या इमारती नुकत्याच जमीनदोस्त करण्यात आल्या. या अनधिकृत इमारती माजी नगरसेवक सीताराम गुप्ता, अनिल गुप्ता आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बांधल्याचा आरोप आहे. त्यामुळे मार्च महिन्यापासून ईडी या प्रकरणाची चौकशी सुरू केली होती. त्यानंतर बुधवारी वसई-विरारमध्ये सीताराम गुप्ता, विवेक तिवारी आणि अनिल गुप्ता यांच्यासह तब्ब्ल 13 ठिकाणी छापे मारून चौकशी आणि तपास केला होता.

वसई-विरार महापालिकेचे नगररचना उपसंचालक वाय. एस. रेड्डी यांच्या हैदराबाद येथील मूळ निवासस्थानी ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली. ही कारवाई गुरुवारपर्यंत सुरु होती. सक्तवसुली संचालनालयाच्या या कारवाई अंती रेड्डी यांच्या घरात 8 कोटी 6 लाख रुपयांची रोकड तसेच 23 कोटी 25 लाख रुपयांचे हिरे जडित दागिने आणि सोने सापडले आहेत. या व्यतिरिक्त विविध महत्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आल्याची माहिती ईडीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

महापालिका स्थापनेपासून रेड्डी हे नगररचना विभागात उपसंचालक पदावर कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांच्या विरोधात नगरसेवक धनंजय गावडे यांनी २०१६ मध्ये तक्रार केली होती. रेड्डी याने प्रकरण मिटविण्यासाठी गावडे यांना अक कोटींची ऑफर दिली होती. गावडे यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली आणि पैसे न घेता २५ लाख रुपयांच्या लाच प्रकरणात पकडून दिले होते. नंतरच्या काळात रेड्डी आणखी सुसाट सुटले आणि अखेर ईडी च्या जाळ्यात फसले.