अबब… देवेंद्र फडणवीसांच्या संपत्तीचा आकडा आला समोर; 62 लाखांचे कर्ज, नावावर एकही वाहन नाही

0
95

नागपूर, दि. 26 (पीसीबी) : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या राजकारणाची दिशा पालटली. सर्वात अगोदर महाविकास आघाडीचा अचंबित करणारा प्रयोग राज्यात झाला. तर त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात भाजप नेतृत्वात महायुती सरकार आणून दाखवले. त्यांच्या पुढाकाराने राज्यात दोन पक्ष फुटले आणि महायुती सरकार एकत्रितपणे पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीला सामोरं जात आहे. त्यांनी दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला. त्यासोबत त्यांनी शपथपत्र दाखल केले. त्यानुसार फडणवीस कुटुंबाकडे 13 कोटींची संपत्ती आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात संपत्ती आणि अन्य तपशील जाहीर केला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे 13 कोटी 27 लाख 47 हजार 728 रुपये इतकी संपत्ती आहे. फडणवीसांच्या आयटी रिटर्न फॉर्म नुसार 2023-24 मध्ये त्यांचे एकूण उत्पन्न 79 लाख 30 हजार 402 रुपये इतके आहे. तर 2022-2023 मध्ये हा आकडा 92 लाख 48 हजार 094 रुपये इतके होते. फडणवीस यांनी पत्नी अमृता यांची संपत्ती 6 कोटी 96 लाख 92 हजार 748 रुपये तर मुलगीची संपत्ती 10 लाख 22 हजार 113 रुपये असल्याचे सांगितले.

उपमुख्यमंत्री फडणवीसांकडे 23 हजार 500 रुपये रोख रक्कम तर पत्नी अमृता यांच्याकडे 10 हजार रुपये रोख रक्कम आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या बँक खात्यात 2 लाख 28 हजार 760 रुपये आहेत. तर त्यांच्या पत्नीकडे 1 लाख 43 हजार 717 रुपये आहेत. फडणवीसांनी राष्ट्रीय बचत योजना, डाक बचत, विमा यात 20 लाख 70 हजार 607 रुपये गुंतवले आहेत. त्यांची पत्नी अमृता यांनी शेअर, म्यूचल फंड आदी मध्ये मिळून 5 कोटी 62 लाख 59 हजार 031 रुपये गुंतवणूक केले आहेत

प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार फडणवीस यांच्याकडे 450 ग्रॅम सोन्याचे दागिने आहेत, ज्याची किंमत 32 लाख 85 हजार इतकी आहे. तर पत्नी अमृता यांच्याकडे 65 लाख 70 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आहेत. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे 4 कोटी 68 लाख 96 हजार रुपयांची अचल संपत्ती आहे. त्यांच्या नावावर 62 लाखांचे कर्ज आहे. तर त्यांच्याकडे एकही वाहन नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे.