नवी दिल्ली, दि. ११ (पीसीबी) : आज जागतिक लोकसंख्या दिवस-2022 साजरा केला जात आहे. हा दिवस दरवर्षी 11 जुलै रोजी साजरा केला जातो. वर्डोमीटरनुसार, या वर्षी जगाची लोकसंख्या सुमारे 8 अब्ज, 800 कोटींपेक्षा जास्त झाली आहे. गेल्या वर्षी ती साडेसात अब्जांपेक्षा जास्त होती. एक अब्ज म्हणजे 100 करोड असे परिमाण आहे.
पूर्वी हा दिवस सण आणि उत्सव म्हणून साजरा केला जात होता आणि सतत विकासाचे आवाहन केले जात होते. मात्र, सतत वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे हा दिवस चिंता व्यक्त करण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी एक निमित्त बनला आहे.
यंदाच्या जागतिक लोकसंख्या दिनाची थीमही यावर आधारित आहे. या दिवशी जगभरातील लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी विविध उपायांचा परिचय करून दिला जातो. याशिवाय कुटुंब नियोजनाचा मुद्दाही चर्चिला जातो. या दिवशी ठिकठिकाणी लोकसंख्या नियंत्रण कार्यक्रम राबवले जातात आणि त्या कार्यक्रमांच्या माध्यमातून लोकांना जागरूक करण्याचा प्रयत्न केला जातो, जेणेकरून वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवता येईल.
या वर्षीच्या जागतिक लोकसंख्या दिनाची थीम ‘8 अब्ज लोकांचे जग: सर्वांसाठी एक लवचिक भविष्य, संधी, हक्क आणि निवडी सुनिश्चित करणे’ अशी आहे. या थीमवरून हे स्पष्ट होते की जगाची लोकसंख्या आठ अब्जांच्या चिंताजनक पातळीवर पोहोचली आहे, परंतु ती हक्क आणि संधीच्या समानतेपासून दूर आहे.