अफगाणिस्तानमध्ये भूकंपाचा मोठा धक्का

0
156

अफगाणिस्तान, दि. २९ – आज सकाळी अफगाणिस्तानमध्ये भूकंपाचा मोठा धक्का बसला आहे. या भूकंपाची तीव्रता ५.७ रिश्टर स्लेक इतकी नोंदवण्यात आली आहे. या भूकंपाचा प्रभाव राजधानी दिल्ली आणि आजुबाजुच्या परिसरातही जाणवला आहे. महत्त्वाचे म्हणजे या भूकंपात अद्यापपर्यंत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. आज सकाळी ११.२६ मिनिटांनी या भूकंपाची नोंद झाली आहे.
महत्त्वाचे म्हणजे दोन आठवड्यांपूर्वीसुद्धा अशाच प्रकारे भूकंपाची घटना घडली होती. त्या भूकंपाची तीव्रताही ४.८ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली होती. सुदैवाने त्या घटनेतही कोणतीही जीवितहानी झालेली नव्हती.

अफगाणिस्तान हा भूकंपासाठी अतिशय संवेदनशील मानला मानला जातो. गेल्या काही वर्षात अफगाणिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात भूकंपाच्या घटना घडल्या आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, या घटनांमध्ये चार हजार पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर नऊ हजार नागरिक जखमी झाले आहेत. या घटनांमध्ये १२ हजारांपेक्षा जास्त घरांचे नुकसान झालं आहे. या भूकंपाची तीव्रता, ५ ते ६.६ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे.
२०२३ च्या ऑक्टोबर महिन्यात अफगाणिस्तानमध्ये चार दिवसांत चार भूकंपाच्या घटना घडल्या होत्या. हेरात प्रांतात आलेल्या भूंकपात २,५०० हून अधिक लोकांचा बळी गेला होता. तर हजारो नागरिक जखमी झाले होते. या भूकंपाच्या घटनेत अनेक गावं भुईसपाट झाली होती. शेकडो नागरिक मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले होते. तसेच शेकडो घरं जमीनदोस्त झाली होती. गेल्या दोन दशकांत अफगाणिस्तानमध्ये झालेले हे सर्वात मोठे भूकंप होते. त्यापूर्वी जून २०२२ मध्ये पूर्व अफगाणिस्तानात आलेल्या भूकंपात १,००० हून अधिक लोकांचा बळी गेला होता.