अपर्णा डोके यांचे पती निलेश डोके यांनी मतदान करतानाचा व्हिडिओ शेअर केल्याने गुन्हा नोंद करण्याची मागणी

0
44

दि. १५(पीसीबी)-पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशीच प्रभाग क्रमांक १८ मध्ये आचारसंहितेचा गंभीर भंग झाल्याचा आरोप होत असून, यामुळे शहराच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भाजपच्या उमेदवार अपर्णा डोके यांचे पती निलेश डोके यांनी मतदान करतानाचा व्हिडिओ व फोटो थेट फेसबुकवर शेअर केल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला आहे.

विशेष म्हणजे, मतदान केंद्रावर मोबाईल फोन नेण्यास स्पष्ट बंदी असताना निलेश डोके यांनी मोबाईल मतदान केंद्रात नेलाच कसा, असा सवाल उपस्थित केला जात आहे. यामुळे मतदान अधिकारी, पोलिस यंत्रणा तसेच बूथ प्रमुखांच्या कामगिरीवर संशयाचे सावट निर्माण झाले आहे.

लोकशाहीचा कणा असलेली मतदान प्रक्रिया ही गुप्त आणि निर्भय असणे अपेक्षित असताना, भाजप उमेदवाराच्या पतीकडूनच नियमांची पायमल्ली होत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. मतदानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करणे हा केवळ आचारसंहिता भंगच नव्हे, तर निवडणूक प्रक्रियेच्या पवित्रतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा प्रकार असल्याचे मत व्यक्त होत आहे.

या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन व पोलिस प्रशासनाने संबंधितांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा नोंदवला आहे का? की हा प्रकार सत्ताधाऱ्यांच्या जवळच्या व्यक्तीचा असल्याने दुर्लक्षित केला जाणार, असा सवाल आता शहरात चर्चेचा विषय ठरत आहे. निवडणूक आयोगाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी विविध स्तरांतून होत आहे. अन्यथा नियम सर्वसामान्यांसाठी आणि सत्ताधाऱ्यांसाठी वेगळे आहेत का, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.