अपमानाचा बदला घेण्यासाठी मुलानेच केला वृद्धेचा खून

0
443

तळवडे, दि. १२ (पीसीबी) – मुलाने घेतलेले नवीन घर पाहण्यासाठी गावाकडून शहरात आलेल्या वृद्ध महिलेचा खून झाल्याची घटना 6 जुलै रोजी सकाळी राजमाता जिजाऊ हाऊसिंग सोसायटी, रुपीनगर, तळवडे येथे घडली. या प्रकरणी पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट एकने एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. त्याने किरकोळ अपमानाचा बदला घेण्यासाठी हा खून केल्याचे समोर आले आहे.

शोभा जगन्नाथ आमटे (वय 68, रा. रुपीनगर, तळवडे. मूळ रा. बेरडवाडी, ता. पाटोदा, जि. बीड) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मुलगा पोपट जगन्नाथ आमटे (वय 38, रा. रुपीनगर, तळवडे) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोपट यांच्या आई त्यांच्या गावी राहत होत्या. पोपट हे मागील अनेक वर्षांपासून पिंपरी-चिंचवड शहरात राहत होते. त्यांनी नुकतेच नवीन घर घेतले. त्यासाठी शोभा या 23 जून रोजी मुलाचे नवीन घर पाहण्यासाठी रुपीनगर येथे आल्या होत्या. त्यांनतर त्या आजारी पडल्या. त्यांना रुग्णालयात काही दिवस दाखल केले होते. दवाखाना झाल्यानंतर त्या काही दिवसांनी गावी जाणार होत्या.

मागील काही दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले होते. 6 जुलै रोजी सकाळी मुलगा पोपट कामासाठी बाहेर गेले. त्यावेळी शोभा या घरात एकट्या होत्या. सकाळी सव्वा अकरा ते पावणे बारा वाजताच्या सुमारास अज्ञातांनी घरात येऊन शोभा यांच्या डोक्यात स्टीलचा बत्ता घातला. त्यानंतर चाकूने वार करून त्यांचा खून केला.

या प्रकरणाचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट एककडून केला जात होता. पोलिसांनी पोपट यांच्या शेजारी राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने हा खून केल्याचे मान्य केले.

ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन मुलाचे वडील आणि पोपट आमटे हे मित्र आहेत. त्यामुळे अल्पवयीन मुलगा पोपट यांच्या घरी आला होता. त्यावेळी पोपट यांच्या आई शोभा यांनी त्याला धक्काबुक्की व अपमान करून घराबाहेर काढले होते. त्यामुळे तिथे राहणाऱ्या लोकांसमोर व महिलांसमोर त्याचा अपमान झाल्याचा राग त्याच्या मनात होता. त्या अपमानाचा बदला घेण्यासाठी त्याने शोभा या घरात एकट्या असताना त्यांच्या डोक्यात लोखंडी बत्ता मारून त्यांचा खून केला.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, सहायक पोलीस आयुक्त सतीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोलीस अंमलदार शिवाजी कानडे, बाळासाहेब कोकाटे, महादेव जावळे, सोमनाथ बोऱ्हाडे, मनोजकुमार कमले, फारूक मुल्ला, अमित खानविलकर, गणेश महाडिक, सचिन मोरे, प्रमोद हिरळकर, उमाकांत सरवदे, अजित रूपनवर, प्रमोद गर्जे, मारोती जायभाये, स्वप्नील महाले, तानाजी पानसरे यांनी केली.