अपघात प्रकरणी ‘तो’ पोलिस अंमलदार निलंबित

0
170

पोलिस वाहनाने महिलेसह एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात महिला गंभीर जखमी झाली. ही घटना मंगळवार (दि. ४) दुपारी अडीचच्या सुमारास बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथील पोलिस चौकीसमोर घडली. याप्रकरणी वाहन चालक अंमलदाराचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे.

नागेश भालेराव (नियुक्ती, हिंजवडी पोलिस ठाणे), असे निलंबित चालक पोलिस अंमलदाराचे नाव आहे. या अपघात शंकुतला पंडित शेळके (रा. महाळुंगे) या जखमी झाल्या असून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मावळ लोकसभा मतदार संघाची मतमोजणी मंगळवारी (दि.४) बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे पार पडली. या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी पिंपरी- चिंचवड पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. बंदोबस्त सुरु असताना ड्युटीवरील अंमलदार नागेश भालेराव शासकीय वाहनात बसले होते. त्यावेळी वाहनाचे इंजिन सुरु होते.

दरम्यान, भालेराव यांचा पाय वेग वाढवण्याच्या पेडलवर (ऍक्सीलेटर) पडला. त्यामुळे वाहनाने समोरून पायी जाणाऱ्या शकुंतला यांच्यासह उभ्या दुचाकींना धडक दिली. यामध्ये शकुंतला यांना गंभीर दुखापत झाली. तसेच, एका तरुणाच्या दुचाकीचे मोठे नुकसान झाले.

घटनास्थळी दाखल झालेल्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना नागेश भालेराव यांनी मद्य सेवन केले असल्याचा संशय आला. त्यामुळे भालेराव यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यामध्ये घटनेच्या आधी भालेराव यांनी अल्कोहोलचे सेवन केल्याचे उघड झाले. खात्याच्या वरिष्ठ पातळीवर याची गंभीर दखल घेत भालेराव यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.

हिंजवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात म्हणाले, पोलिस अंमलदार नागेश भालेराव यांच्या ताब्यात असलेल्या वाहनाने महिलेसह एका दुचाकीला धडक दिली आहे. यामध्ये पादचारी महिला जखमी झाली आहे. भालेराव यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. यामध्ये त्यांनी अल्कोहोल सेवन केले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे भालेराव यांच्यावर गुन्हा दाखल करून निलंबन करण्यात आले आहे. तसेच, त्यांची खात्या अंतर्गत चौकशी देखील सुरू करण्यात आली आहे.