अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना ब्राह्मण महासंघासह 34 संघटनांचा जाहीर पाठिंबा

0
298

पिंपरी, दि. २४ (पीसीबी) –  चिंचवड विधानसभेचे अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांची निवडणूक जनतेनेच हातात घेतली आहे. त्यांच्या समर्थनार्थ जनतेसह विविध संघटना पुढे आल्या आहेत. कलाटे यांना ब्राह्मण महासंघासह शहरातील विविध 34 संस्था, संघटनांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे कलाटे यांच्या पाठिशी जनता ठामपणे उभी असल्याचे स्पष्ट होते. भाजप पक्षाचा ब्राह्मण समाजाबद्दलचा दृष्टिकोन बदलताना दिसतोय. तसेच पक्ष स्थापनेपासून ब्राह्मण समाजाचा द्वेष करणाऱ्या स्वतःला सेक्युलर म्हणणाऱ्या राष्ट्रवादी पक्षाला मत देण्यापेक्षा ब्राह्मण समाजाने राहुल कलाटे यांना मतदान करण्याचे आवाहन महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आणि कसब्यातील उमेदवार आनंद दवे यांनी केले आहे.

चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक शिट्टी या चिन्हावर लढत असलेले राहुल कलाटे यांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची रावेत येथे जाहीर सभा झाली. सभेला मोठा जनसमुदाय उपस्थित होता. सभेचे पटांगण जनतेच्या गर्दीने भरले होते. नागरिक बाहेर उभे राहिले होते. अनेकांनी उभे राहून संपूर्ण सभा ऐकली. कार्यकर्त्यांमध्ये मोठा विश्वास होता. राहुल कलाटे यांच्या घोषणांनी सभेचा परिसर दणाणून सोडला होता. जनतेसह विविध संघटनाही कलाटे यांच्या समर्थनार्थ उतरल्या आहेत. प्रकाश आंबेडकर यांची मोठी सभा झाल्याने कलाटे यांच्या समर्थकांचा उत्साह वाढला आहे. कार्यकर्त्यांना मोठी उर्जा मिळाली आहे.

शिवसेनेतील काही पदाधिका-यांची केलेली हकालपट्टी ही मागे घेतली आहे. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साह असून अतिशय ताकदीने, जोमाने राहुल कलाटे यांचा प्रचार सुरु केला आहे. त्यामुळे शिवसैनिक, वंचित बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते आणि संपूर्ण मतदारंसघातील जनतेच्या बळावर आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास राहुल कलाटे यांनी व्यक्त केला.

ब्राह्मण महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आनंद दवे म्हणाले, भाजपचा ब्राह्मण समाजाबद्दलचा दृष्टिकोन बदलताना दिसतोय. या पक्षाचे निर्णय जे देशहित आणि समाजहित या दृष्टीने होत होते ते यापुढेही होतीलच असे नाही. 21 आमदार असलेल्या पुणे जिल्ह्यामध्ये प्रत्येक समाजाचा प्रतिनिधी असावा अशी ब्राह्मण महासंघाची भूमिका आहे. मागील वेळी कोथरूड व आता कसबा मतदार
संघात समाजातील प्रतिनिधींना संधी नाकारण्यात आली त्यामुळेच नाराजी तयार झाली. या सगळ्या
करिता भारतीय जनता पक्ष कारणीभूत आहे.
तसेच पक्ष स्थापनेपासूनब्राह्मण समाजाचा द्वेष करणाऱ्या स्वतःला सेक्युलर म्हणणाऱ्या राष्ट्रवादी पक्षाला मतदेण्यापेक्षा चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना आपण मतदान करावे. त्यांची निशाणी शिट्टी आहे.

या ३४ संस्थांनी दिला राहुल कलाटे यांना पाठिंबा!

ब्राह्मण महासंघ, भारतीय पार्टी (लोकतांत्रिक), ख्रिस्ती नवनिर्माण सेना, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती, दलित पॅन्थर सेना, गोंधळी समाज विकास सेवा संघ, सम्राट अशोक सेना, स्वराज्यवादी बहुजन महासंघ, फुले-आंबेडकर लोकसेवा प्रतिष्ठान, रिपब्लिकन जनशक्ती, स्वराज्य वाहन चालक संघटना, ईशाअते दिन / मदरसा अरबिया, हेल्प ऑफ पीपल चॅरिटेबल ट्रस्ट, अंगमेहनती कष्टकरी संघर्ष समिती पुणे, पिंपरी-चिंचवड शहर, राष्ट्रीय जनमंच (सेकुलर ), दलित युवक आंदोलन महाराष्ट्र राज्य, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी, समता अधिकार आंदोलन, प्रबुद्ध संघ, अपना वतन, भीम आर्मी, समाजवादी पार्टी, संभाजी ब्रिगेड,पुणे जिल्हा, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, नॅशनल ब्लॅक पँथर पार्टी, मातंग एकता आंदोलन, ख्रिश्चन एकता मंच, सिद्दार्थ संघ ट्रस्ट, स्वाभिमानी घर बचाव संघर्ष चळवळ, दलित पॅन्थर, साई गणेश पार्क, जय तुळजाभवानी मराठवाडा मित्र मंडळ, चिंचवड आणि बघतोय रिक्षावाला महाराष्ट्र पुणे अशा 33 संघटनांनी राहुल कलाटे यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे कलाटे यांची ताकद वाढली आहे.