अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांच्या विजयाचा मार्ग मोकळा : संभाजी ब्रिगेड , छावा संघटना आणि पिंपरी चिंचवड मुस्लिम विकास परिषदेने दिले बळ

0
87

चिंचवड, दि. १८ : चिंचवड विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांची आपल्या प्रचार तंत्रातील शेवटचे ब्रह्मास्त्र वापरून आज संभाजी ब्रिगेड , छावा संघटना आणि पिंपरी चिंचवड मुस्लिम विकास परिषदेने भाऊसाहेब भोईर यांना जाहीर पाठिंबा दिला. या अगोदर भाऊसाहेब भोईर यांनी सकल धनगर समाज, सकल मातंग समाज, अपना वतन संघटना, यंग फ्रेंड सर्कल, अखिल भारतीय गौरक्षा परिषद, शिवशाही व्यापारी संघ, ऑल इंडिया फ्रेंड्स सर्कल, प्रजाशक्ती पक्ष, आर. पी. आय (कांबळे गट), आर. पी. आय (निकाळजे गट) अशा अनेक संघटना पाठींबा दिला असून आज पूनावळे येथे घेण्यात आलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत माध्यमांसमोर उपस्थित संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट करीत आपण भाऊसाहेब भोईर यांना विजयी करून विधानसभेत आमदार म्हणून पाठवू असे सांगितले.

भाऊसाहेब भोईर म्हणाले ” येत्या २३ तारखेला तुम्हाला मी विजयी झालेलो दिसेल. मला हलक्यात घेत होते त्यांना माझी ताकद लवकरच कळेल. पत्रकारांना माहिती असेल की माझ्यासाठी आणखी कोण कोण कामे करतय. मी आत्ताच त्यांची नावे जाहीर करणार नाही. पण २३ तारखेच्या नंतर ते स्वतः नावे जाहीर करतील. माझ्या पाठीशी असलेले अंडर करंट मतदान माझ्या विजयात परिवर्तन करण्यास कारणीभूत ठरणार आहे. आज संभाजी ब्रिगेड , छावा संघटना आणि पिंपरी चिंचवड मुस्लिम विकास परिषदे अशा अनेक संघटनांनी व पक्षांनी मला जाहीर पाठिंबा देवून जी ताकद दिली आहे. त्या जोरावर मी चिंचवड मतदार संघाचे विधानसभेत नेतृत्व करेन असा मला विश्वास आहे”.

छावा संघटनेचे शहराध्यक्ष धनाजी यळकर म्हणाले
चिंचवड मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही भाऊसाहेब भोईर यांनी छावा मराठा महासंघाच्या वतीने जाहीर पाठिंबा दिला आहे.  समाज कार्य करत असताना भाऊसाहेबांचे काम आम्ही बघितलं आहे. सामान्य लोकांचा कर रुपयातील पैसा हा विकास कामांसाठी मार्ग लागला पाहिजे. यात काळा बाजार होतो आहे तो थांबवला पाहिजे. त्याची जबाबदारी आमच्या सारख्या सामाजिक संघटनांची आहे. म्हणून शुद्ध विचारांचा सुसंस्कृत लोकप्रतिनिधी विधानसभेत गेला पाहिजे म्हणून भाऊसाहेब भोईर यांना आम्ही पाठिंबा देवून विधानसभेत आमदार म्हणून पाठवणार आहोत.

पिंपरी – चिंचवड शहराचे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण कदम म्हणाले की “भाऊसाहेब भोईर हे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील अनुभवी व्यक्तिमत्त्व असताना देखील महाविकस आघाडीकडून त्यांच्यावर वेळोवेळी अन्याय केला. क्षमता असताना देखील त्यांना उमेदवारी डावलली. तिकीट देणारे निर्दयी झाले. पण भाऊसाहेबांनी मागे न हटता त्यांनी आपली ताकद दाखवायची ठरवली. त्यांना ताकद देण्यासाठी आणि समजाचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्हाला योग्य उमेदवार भाऊसाहेब वाटतात. पिंपरी चिंचवडमध्ये प्रचंड असे प्रश्न असताना ज्या पद्धतीने प्राधिकरण अनधिकृत बांधकामाचा एवढा मोठा प्रश्न असताना सुद्धा या प्रश्नाचं दर पाच वर्षाला राजकारण केलं जात आहे. परंतु प्रश्न काही सुटत नाहीत जैसे थे असतात. ते प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही आपल्याला भाऊसाहेब भोईर यांना आमदार करण्यासाठी आम्ही ताकद पणाला लावली आहे”

पिंपरी चिंचवड मुस्लिम विकास परिषदेचे अध्यक्ष अखिल मुजावर म्हणाले “शहरातील मुस्लिम अल्पसंख्य समाजाचे अनेक प्रश्न आहेत. ते आतापर्यंत कुठल्याही पक्षाच्या नेत्याने किंवा लोकप्रतिनिधीने सोडवले नाहीत . सगळे जाती – धर्माचे राजकारण करतात. परंतु भाऊसाहेब भोईर यांनी कधीही जाती पातीचे राजकारण केले नाही. ते सर्व धर्मियांना सोबत घेऊन चालणारे आहेत. मी स्वतः भाऊसाहेबांच्या नेतृत्वाखाली कार्य केले आहे. त्यांच्या कामाची पद्धत माहिती आहे. सर्व समाजाला एकत्र घेवून जाणारे व्यक्तिमत्त्व असल्यामुळे आम्ही भाऊसाहेब भोईर यांना पाठींबा दिला आहे.

पिंपरी चिंचवड मुस्लिम विकास परिषदेचे शफिऊल्ला काजी म्हणाले की “थेरगावमध्ये आमच्या मशिदीवर रात्री अपरात्री कार्यवाही केली. तेव्हा सगळ्या लोकप्रतिनिधींनी आप आपले मोबाईल बंद करून ठेवले. आम्हाला कुणीच न्याय दिला नाही. आता आम्हाला न्याय देणारे एकमेव व्यक्तिमत्व हे भाऊसाहेब भोईर वाटतात. त्यांच्या हाताला धरून आम्ही आमचे प्रश्न सोडवू शकतो. त्यामुळे भाऊसाहेबांना बळ देत आहे. चिंचवड विधानसभा मतदार संघातील आमचे मुस्लिम बांधव भाऊसाहेब भोईर यांना भरघोस मतदान करून विजयश्री खेचून आणतील याची मी खात्री देतो.

आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत संभाजी ब्रिगेड, छावा संघटना आणि पिंपरी चिंचवड मुस्लिम विकास परिषदेने भाऊसाहेब भोईर यांना जाहीर पाठिंबा दिला. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांमध्ये –  प्रवीण कदम ( संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष ) , अनंत कोऱ्हाळे ( माजी नगरसेवक : शिवसेना उबाठा गट ) , अखिल मुजावर ( अध्यक्ष पिंपरी चिंचवड मुस्लिम विकास परिषद – ) , भाऊसाहेब भोईर , शाफिल्ला काजी : ( पिंपरी चिंचवड मुस्लिम विकास परिषद ) , दीपक कांबळे ( आंबेडकर चळवळीचे सामाजिक कार्यकर्ते ) , धनाजी यळकर ( छावा संघटना : शहराध्यक्ष ) , संजय जाधव ( प्रदेशाध्यक्ष: छावा संघटना ) इत्यादी नेते उपस्थित होते