अपक्ष आमदारांचा भाव काल शेअर मार्केटसारखा , काही आमदारांना 2 एकर जमीन

0
133

पुणे,दि.१३ जुलै (पीसीबी) : काँग्रेसच्या मतांमध्ये झालेली फाटाफूट आणि महाविकास आघाडीच्या छोट्या घटक पक्षांसह बहुसंख्य अपक्ष आमदारांनी महायुतीच्या उमेदवारांना केलेल्या मतदानामुळे विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे सर्वच्या सर्व नऊ उमेदवार विजयी झाले. काँग्रेच्या प्रज्ञा सातव यांच्यासह ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर विजयी झाले असले, तरी राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाने समर्थन दिलेल्या शेकापच्या जयंत पाटील यांना पराभवाचा धक्का बसला. याविषयी प्रतिक्रिया देताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी काही आमदारांना 2 एकर जमीन दिल्याचा आरोप केला.

संजय राऊत काय म्हणाले?
“याच सात लोकांनी चंद्रकांत हंडोरे यांना पाडलं होतं. आम्हाला कोणताही धक्का बसलेला नाही. शिवसेना राष्ट्रवादी यांचं कोणतंही मत फुटलेलं नाही. काँग्रेसचे ते सात जण केवळ कागदावर काँग्रेससोबत होते.” असं संजय राऊत म्हणाले.

“अपक्ष आमदारांचा भाव काल शेअर मार्केटसारखा वाढत होता. शिवसेनेकडे केवळ 15 मतं असतानाही मिलिंद नार्वेकर निवडून आले. शेकापचे जयंत पाटील निवडून आले असते, पण गणित जुळलं नाही. जयंत पाटलांकडे स्वतःच्या पक्षाचे मत नव्हते. जयंत पाटलांसाठी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले. ते महाविकास आघाडीतील महत्वाचा घटक आहेत. शरद पवारांनी जयंत पाटलांसाठी प्रामाणिकपणे काम केलं. पण काही आमदारांना 2 एकर जमीन देखील दिली गेली.” असा आरोप संजय राऊत यांनी केला.