..अन् 42 वर्षांनी भेटले दहावीचे वर्गमित्र

0
251

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) – पिंपरीतील रयत शिक्षण संस्थेच्या नव महाराष्ट्र विद्यालयातील सन 1978-79 या शैक्षणिक वर्षातील 10 वीच्या वर्गातील माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी तब्बल 42 वर्षांनी भेटले. दहावीतील आठवनींना सर्वांनी उजाळा दिला.वाल्हेकरवाडी येथे अत्यंत उत्साही वातावरणात स्नेह मेळावा पार पडला. तब्बल 42 वर्षाच्या कालखंडानंतर विद्यार्थी मित्र-मैत्रिणी एकमेकांना भेटल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद ओसंडून वाहतांना दिसून येत होता. या स्नेहमेळाव्यात या वर्गाला शिक्षण देणारे स्वामी सर, जगताप सर, कुंभार सर आणि जाधव सर उपस्थित होते. या सरांचे वर्गातील विद्यार्थ्यांना बहुमोल असे मार्गदर्शन लाभलेले असल्याकारणाने सर्व विद्यार्थी हे उद्योग-धंदा, डॉक्टर, पोलीस सेवा, सामाजिक, शैक्षणिक, शेती, शासकीय कर्मचारी, खाजगी कंपनी कामगार अशा वेगवेगळ्या क्षेत्रात स्थिरावून आता काहीजण सेवानिवृत्त झालेले आहेत.

या 78-79 सालच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांपैकी पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे उपाध्यक्ष विनोद नाणेकर हे एक उद्योजक होत. या स्नेहमेळाव्याची भोजन व्यवस्था उद्योजक रतनलाल ऊनेचा, दीपक दळवी, शंकर रसाळ, राजीव भागवत, मनोहर वाडकर, मोहन बोरुडे, सुरेखा माणिक बोगम यांनी उत्तमरीत्या पार पाडली. या स्नेह मेळाव्यानंतर या सर्व माजी विद्यार्थांनी वर्षातून कमीत कमी एकदा भेटण्याचे ठरविले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संपत महाराज मेटे यांनी केले. गुरुजनांचे स्वागत, अभिनंदन व आभार उद्योजक विनोद नाणेकर यांनी केले.