अन्नधान्यांवरील प्रस्तावित जीएसटीविरोधात बंदला संमिश्र प्रतिसाद

0
310

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) – केंद्र सरकारने अन्नधान्यांववर प्रस्तावित केलेल्या पाच टक्के वस्तु आणि सेवा कर (जीएसटी)च्या विरोधात फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ पिंपरी-चिंचवडने पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. पिंपरी, आकुर्डी, निगडी, सांगवीतील होलसेल विक्रेत्यांनी दुकाने बंद ठेऊन बंदमध्ये सहभाग घेतला.

कोरोना महानारीनंतर उद्योग व्यवसाय, व्यापार संकाटातून बाहेर येत असताना इंधनाचे, गॅस, सीएनजीचे दर गगनला भिडले आहेत. महागाईचा मोठा भडका उडाला आहे. सामान्य नागरिक महागाईच्या आगीतून होरपळत असताना केंद्र सरकारने ब्रँन्डेड अन्नधान्यांवर यापूर्वीच जीएसटी लावलेला आहे. त्यामुळे महागाई प्रचंड वाढली. आता खुल्या अन्नधान्यांवर जीएसटी लावण्याचे प्रस्तावित करणे म्हणजे शेतकरी, सामान्य ग्राहकांवर जिझीयाकार लावण्यासारखा प्रकार असल्याचा आरोप व्यापा-यांनी केला आहे.

फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष गोविंद पानसरे म्हणाले, केंद्र सरकारने खाद्यान्नांवर पाच टक्के जीएसटी प्रस्तावित केला आहे. त्याला व्यापा-यांचा विरोध आहे. त्यासाठी पुकारलेल्या बंदला पिंपरी-चिंचवडमध्ये 80 टक्के प्रतिसाद मिळाला आहे. शहरातील होलसेलची दुकाने बंद आहेत. केंद्र सरकारने खाद्यान्नांवर प्रस्तावित केलेला जीएसटी रद्द करावा. जीएसटी आणताना केंद्र सरकराने खाद्यान्नांवर जीएसटी लावणार नाही असे सांगितले होते. परंतु, पॅक फुडवर जीएसटी लावला. आता तर खुल्या अन्नाधान्यांवर जीएसटी लावत आहे. कोरोनामुळे महागाई वाढली आहे. अशातच खाद्यान्नांवरील वाढीव जीएसटीमुळे महागाईचा भडका उडणार आहे. प्रस्ताविक अन्याकारक जीएसटीचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी पुकारलेल्या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला.