रावेत,दि. ६ (पीसीबी)- मुद्रा योजनेतून कर्ज देण्याच्या बहाण्याने पावणे आठ लाखांची फसवणूक अनोळखी व्यक्ती फोन करून मुद्रा योजनेंतर्गत कर्ज देण्याचे सांगत असेल तर सावध रहा. यामध्ये तुम्ही फसवणूक होऊ शकते. रावेत येथे एका व्यक्तीला मुद्रा योजनेंतर्गत कर्ज देण्याचे आमिष दाखवून सर्व कागदपत्रे घेत सात लाख 82 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
गोपीचंद देवराम काटे (वय 46, रा. पुनावळे, रावेत) यांनी याप्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी काटे यांना 9953495650 या क्रमांकावरून फोन आला. फोनवरील व्यक्तीने तो मुद्रा फायनान्स एमएसएमई मिनिस्ट्री गव्हर्नमेंट ऑफ इंडिया येथून बोलत असल्याने सांगितले. मुद्रा योजने अंतर्गत कर्ज हवे आहे का, अशी फोनवरील व्यक्तीने विचारणा केली. त्यावर काटे यांनी कर्जाची आवश्यकता असल्याचे सांगितले.
त्यानंतर फोनवरील व्यक्तीने फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून पॅन कार्ड, आधारकार्ड, जीएसटी सर्टिफिकेट, तीन महिन्यांचे बँक स्टेटमेंट आणि फोन फोटो अशी कागदपत्रे घेतली. त्यानंतर वेगवेगळ्या कारणांसाठी काटे यांच्याकडून सात लाख 82 हजार रुपये घेतले. एवढी रक्कम घेऊन देखील काटे यांचे कर्ज प्रकरण मंजूर न करता त्यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. रावेत पोलीस तपास करीत आहेत.