अनिल देशमुख अडचणीत, महाविकास आघाडीला मोठा धक्का

0
71

मुंबई, दि.४ (पीसीबी)
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप नेते गिरीश महाजन यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी जळगावच्या तत्कालीन पोलीस अधीक्षकांवर दबाव टाकल्याचा आरोप अनिल देशमुख यांच्यावर आहे. सीबीआयने या प्रकरणी आता अनिल देशमुख यांनादेखील आरोपी बनवलं आहे. याआधी या गुन्ह्यात विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण आणि इतर आरोपी होते. पोलीस अधिकारी प्रवीण मुंढे यांनी अनिल देशमुख यांच्या विरोधात जबाब दिला होता.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर पुण्यात एक गुन्हा दाखल झाला होता. गिरीश महाजन यांच्यावर त्यावेळी मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. पण हा गुन्हा जळगावात दाखल व्हावा यासाठी अनिल देशमुख गृहमंत्री असताना त्यांनी तत्कालीन जळगावचे एसपी प्रवीण मुंढे यांना सातत्याने फोन केला होता. अनिल देशमुख यांनी गिरीश महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करावा यासाठी एसपींवर दबाव टाकला होता, असा जबाब स्वत: प्रवीण मुंढे यांनी सीबीआयकडे दिला होता.

गृहमंत्री अनिल देशमुख मला सातत्याने फोन करत होते, असं तत्कालीन प्रवीण मुंडे आपल्या जबाबात म्हणाले. सीबीआयने विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यात आता एसपींवर दबाव टाकला म्हणून अनिल देशमुख यांनासुद्धा आरोपी करण्यात आलं आहे. गिरीश महाजन यांच्यावर खोटा मोक्का गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आल्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सुपूर्द करण्यात आलं होतं. सीबीआयकडून या प्रकरणाचा सविस्तर तपास सुरु आहे.
मविआ सरकार काळात गिरीश महाजन यांना या गुन्ह्यात अडकवण्यासाठी ट्रॅप करण्यात आलं होतं, असादेखील खुलासा झाला होता. विधानसभेच्या काळात अधिवेशनात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्याशी संबंधित तीन स्टिंग ऑपरेशनचे व्हिडीओ दाखवले होते. देवेंद्र फडणीस यांनी संबंधित स्टिंग ऑपरेशनचा पेनड्राईव्ह सभागृहात सादर केला होता.