अनधिकृत बांधकाम कारवाई थांबवण्यासाठी लाच घेताना पोलीस रंगेहात सापडला

0
351

पुणे, दि. ५ (पीसीबी) – अनधिकृत बांधकाम कारवाई थांबवण्यासाठी 1 लाख 10 हजार रुपये लाच मागून 10 हजार रुपये लाच घेणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबल शिरीष आप्पासाहेब कामठे याला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. पोलीस कॉन्स्टेबल शिरीष कामठे (वय – 36) यांच्याविरुद्ध लोणीकंद पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई शनिवारी (दि.4) केली.

याबाबत 52 वर्षाच्या तक्रारदाराने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारदार यांनी खरेदी केलेल्या जागेमध्ये दुसऱ्या व्यक्तीने अतिक्रमण (Encroachment) केले. तक्रारदार यांच्या जागेत सुरु असलेले अनधिकृत बांधकाम थांबवण्यासाठी लोणीकंद पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल शिरीष कामठे याने एक लाख दहा हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे एसीबीकडे तक्रार केली. प्राप्त तक्रारीची पडताळणी केली असता कामठे याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. कामठे याने एक लाख दहा हजार रुपये मागणी करुन त्यातील 10 हजार रुपये स्विकारताना पुणे एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक विजयमाला पवार पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे पोलीस शिपाई महाशब्दे, महिला पोलीस शिपाई साका, चालक पोलीस हवालदार देसाई यांच्या पथकाने कारवाई केली.