- महाराष्ट्रातील तरुणाईच्या भवितव्याशी खेळू नका
पुण्यातील कल्याणीनगर परिसरात १९ मे रोजी भीषण अपघात झाला. एका अल्पवयीन मुलाने त्याची पोर्श ही अलिशान कार बेदरकारपणे एका दुचाकीवर घातली. त्यामुळे दुचाकीवरील जोडप्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना उजेडात आल्यानंतर या प्रकरणातील अनेक कांगोरे समोर येऊ लागले. अल्पवयीन चालक मद्यधुंद अवस्थेत कार चालवत होता. या घटनेच्या आधी तो एका बारमध्ये बासून मद्य प्राशन करत होता. याचे व्हीडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यामुळे पुण्यातील अनधिकृत बार, पबबाबतचे नियम धाब्यावर बसवले जात असल्याचा दावा आमदार रवींद्र धंगेकर, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी आज पुण्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात आंदोलन केलं.
रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारे यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांची त्यांनी कानउघाडणी केली. “महाराष्ट्रातील तरुणाईच्या भवितव्याशी खेळू नका. तुम्ही तरुणाईला पोखरून काढत आहात. हा ड्रग्स कुठून सापडतो. अजय तावरेंना ललित पाटील प्रकरणातच अटक झाली पाहिजे होती. का त्यांना सोडलं जातंय? असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला. तर, पुण्यातील अनधिकृत पब, बार आणि हॉटेल्सची यादीच धंगेकरांनी आणली होती. या यादीत प्रत्येकावर कारवाई केल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात येत होता. परंतु धंगेकर आणि अंधारे कारवाई झालीच नसल्यावर ठाम होते. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते आणि पोलिसांमध्ये बरीच बाचाबाची झाली.
“पाकीट संस्कृतीत अधिकारी अडकले आहेत. समाजातील मुले बरबाद होत आहेत हे दिसत नाही. त्यांची पाकीटसंस्कृती थांबली पाहिजे याकरता इथे आलो आहे. पुणेकरांची मुले सुरक्षित राहिली पाहिजे याचा विचार यांनी केला नाही तर आम्ही लोकशाहीपद्धतीने आंदोलन करू”, अशा इशाराही धंगेकरांनी दिला. वाचून दाखवलेल्या यादीतून तुम्ही कोणाकडून किती पैसे घेता हे लिहिलेलं आहे. तुम्हाला लाज कशी वाटत नाही”, असंही ते संतप्तपणे म्हणाले.
दरम्यान, सुषमा अंधारे आणि रवींद्र धंगेकर यांचं बोलून झाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पोलीस अधिकाऱ्यांनीही त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. “हे आरोप पूर्णतः चुकीचे आरोप आहेत. जिल्हाप्रमुख म्हणून अशा पद्धतीने कोठे काही होत असेल तर याबाबत मी चौकशी करेन. जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई केली जाईल. राज्य उत्पादन शुल्क विभागाचा कार्यभार घेतल्यापासून गेल्या दोन वर्षांपासून ८ हजार गुन्हे दाखल झाले आहेत. या विभागाचा प्रत्येक व्यक्ती रात्रंदिवस पुणेकरांसाठी झगडत आहे. तुमचं जे स्वप्न आहे तेच आमचंही स्वप्न आहे. याबाबतीत ८ हजाराच्या वर गुन्हे दाखल झाले आहेत. पब, बार, हॉटेलमालकावर कारवाई करण्याबाबत दुप्पट प्रकरणात वाढ झाली आहे. १७ परवाने निलंबित करण्यात आले आहेत. २ परवाने कायमस्वरुपी बंद करण्यात आले आहे”, असं पोलीस अधिकारी म्हणाले.
पोलीस अधिकाऱ्यांच्या या स्पष्टीकरणावर सुषमा अंधारे आणि रवींद्र धंगेकर अधिकच संतापले. त्यामुळे त्यांनी ४८ तासांचा अल्टिमेटम दिला. चला, बेकायदा पब-बार दाखवतो असं म्हणत त्यांनी पुढील ४८ तासांत या आस्थापनांवर कारवाई न झाल्यास उग्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.