“अध्यात्म हा भारतीय संस्कृतीचा मूलाधार!” – पंडित वसंत गाडगीळ

0
184

पिंपरी, दि. (पीसीबी) – “अध्यात्म हा भारतीय संस्कृतीचा मूलाधार आहे!” असे विचार ज्येष्ठ संस्कृतपंडित वसंत गाडगीळ यांनी माधवराव पटवर्धन सभागृह, महाराष्ट्र साहित्य परिषद, टिळक रस्ता, पुणे येथे व्यक्त केले. रविवार, दिनांक ०७ जानेवारी २०२४ रोजी ज्येष्ठ कवी विलास कुंभार लिखित ‘अध्यात्म दर्पण’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन करताना वसंत गाडगीळ बोलत होते. याप्रसंगी आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे माजी विश्वस्त डॉ. अजित कुलकर्णी, लिज्जत पापडचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश कोते, सनदी लेखापाल प्रा. डॉ. अशोककुमार पगारिया, ॲड. प्रमोद आडकर, ह. भ. प. अशोकमहाराज गोरे, ज्येष्ठ साहित्यिक नारायण कुंभार, प्रकाशक सुनील उंब्रजकर आणि कवी विलास कुंभार यांची व्यासपीठावर; तसेच साहित्यिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची सभागृहात उपस्थिती होती.

अस्खलित संस्कृतमधून आपले विचार मांडताना ९४ वर्षीय ज्येष्ठ संस्कृतपंडित वसंत गाडगीळ पुढे म्हणाले की, “विलास कुंभार यांचा अध्यात्माचा व्यासंग असल्याने त्यांच्या कवितांमध्ये वैचारिक प्रगल्भता आढळून येते!” डॉ. अजित कुलकर्णी यांनी अध्यात्मातील लौकिक दर्शनाचे विविध दाखले देत ‘अध्यात्म दर्पण’ या संग्रहातील कवितांमधून प्रपंच आणि परमार्थ यांचा सुरेख समतोल साधला आहे, असे मत मांडले. कवी विलास कुंभार यांनी आपल्या मनोगतातून कवितालेखनाची प्रक्रिया मांडताना कुटुंबीय, आप्तेष्ट, मित्रपरिवार आणि समाजाप्रति कृतज्ञता व्यक्त केली.

सरस्वतीपूजन तसेच अथर्व बोत्रे यांनी बासरीवादनातून देस, हंसध्वनी या रागांच्या केलेल्या सुरेल सादरीकरणाने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. सुनील उंब्रजकर यांनी प्रास्ताविक केले. ज्येष्ठ कवयित्री शोभा जोशी आणि तानाजी एकोंडे यांचीही कार्यक्रमाला विशेष उपस्थिती होती. अमोल कुंभार, पंढरीनाथ कुंभार, सुहास सरवडेकर, मुरलीधर दळवी यांनी संयोजनात सहकार्य केले. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले. नारायण कुंभार यांनी आभार मानले. अशोक गोरे यांनी म्हटलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.