“अध्यात्माला विज्ञानाची जोड दिल्यास भारत विश्वगुरू होईल!” – पद्मभूषण डॉ. विजय भटकर

0
467

पिंपरी,दि. २९ (पीसीबी)”अध्यात्माला विज्ञानाची जोड दिल्यास येत्या काही दिवसांत भारत निश्चितपणे विश्वगुरू होईल!” असा आशावाद विख्यात वैज्ञानिक पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांनी डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ प्रेक्षागृह, पिंपरी येथे बुधवार, दिनांक २८ सप्टेंबर २०२२ रोजी व्यक्त केला. ज्येष्ठ प्रशासक प्रा. सुभाषचंद्र भोसले यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त डॉ. नीता मोहिते लिखित ‘सृजन यज्ञ’ आणि ह.भ.प. सुभाषमहाराज गेठे लिखित इंग्रजी ‘चांगदेव पासष्टी’ या ग्रंथांचे प्रकाशन करताना भटकर बोलत होते. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. शांतिब्रह्म ह.भ.प. मारोतीमहाराज कुऱ्हेकर, प्र-कुलपती डॉ. भाग्यश्री पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. विजय भटकर पुढे म्हणाले की, “विज्ञान आणि तत्त्वज्ञान या क्षेत्रांतील व्यक्तींनी आत्मसाक्षात्कार या संकल्पनेची अनुभूती घेण्यासाठी अध्यात्माला मुळापासून समजून घेतले पाहिजे. आदर्श प्रशासकाचे जीवन कसे असावे याचा उत्तम वस्तुपाठ म्हणजे ‘सृजन यज्ञ’ हा ग्रंथ होय. ‘चांगदेव पासष्टी’ या ग्रंथाचे विविध भाषांमध्ये अनुवाद झाले तर भारतीय अध्यात्माची सर्व जगाला ओळख होईल. शासन, सार्वजनिक आणि खासगी संस्था यांच्या एकत्रित योगदानातून जागतिक दर्जाच्या संस्थांची उभारणी देशात केल्यास विकसित भारताची ती नांदी ठरेल; तसेच विश्वाचे नेतृत्व करण्याची ती वाटचाल असेल!” डॉ. नीता मोहिते यांनी ‘सृजन यज्ञ’ या चरित्रग्रंथाच्या लेखनाचा प्रवास कथन करताना वेळेचा काटेकोरपणा, चिकाटी, उत्तमाचा ध्यास अशा अनेक चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या, असे कृतज्ञतापूर्वक नमूद केले; तर ह.भ.प. सुभाषमहाराज गेठे यांनी अनेक वैज्ञानिक सिद्धान्त ‘चांगदेव पासष्टी’ या छोट्याशा ओवीबद्ध ग्रंथात असून माणसांत अंतर्बाह्य बदल करणारी ती संहिता असल्याने तिचा इंग्रजी अनुवाद करावासा वाटला, असे सांगितले.

सत्कारमूर्ती प्रा. सुभाषचंद्र भोसले यांनी आई-वडील, आप्त, शिक्षक, मित्र आणि निंदक यांनी माझ्या जीवनाला आकार दिला, अशी कृतज्ञता व्यक्त करून भारताच्या ऊर्जितावस्थेसाठी उर्वरित आयुष्य व्यतीत करण्याची इच्छा व्यक्त केली. डॉ. पी. डी. पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून, “प्रा. सुभाषचंद्र भोसले यांनी आपल्या प्रामाणिक कार्यातून शून्यातून विश्व निर्माण केले. त्यांचे जीवनकार्य कथन करणारा ‘सृजन यज्ञ’ हा ग्रंथ समाजाला मार्गदर्शक ठरेल!” असे मत व्यक्त केले. ज्ञानेश्वर सावंत यांनी प्रास्ताविक केले. शर्मिला शिंदे यांनी सुरेल आवाजात पद्यरचनांच्या सादरीकरणातून मान्यवरांची ओळख करून दिली. नीलेश शिंदे यांनी तबलासाथ केली. पाच सुवासिनींकडून औक्षण तसेच प्रतिभा चव्हाण यांनी मानपत्राचे वाचन केल्यानंतर सत्कारमूर्तींना गौरविण्यात आले. केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दृकश्राव्य माध्यमातून शुभेच्छा दिल्या; तर डॉ. सीताराम उमर्जीकर आणि शिवानी भोसले यांनी शुभेच्छापर मनोगते व्यक्त केलीत. एस. एन. सुदर्शन यांनी ‘चांगदेव पासष्टी’च्या इंग्रजी आवृत्तीची माहिती दिली. प्रा. दिगंबर ढोकले यांनी सूत्रसंचालन केले. कर्नल (निवृत्त) मधुकर भोसले यांनी आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.