अधिक नफ्याच्या आमिषाने १२ लाखांची फसवणूक

0
214

हिंजवडी, दि. १९ (पीसीबी) – कमी वेळेत जास्त पैसे कमावण्याचा मोह एका व्यक्तीला चांगलाच महागात पडला आहे. व्हिडीओला लाईक केल्यास पैसे मिळतील, अशा भूलथापांना बळी पडून त्या व्यक्तीने तब्बल १२ लाखांहून अधिक पैसे गुंतवले. मात्र परतावा मिळण्याची वेळ आली असता आरोपींनी ऑनलाईन गाशा गुंडाळला. हा प्रकार १४ आणि १५ जानेवारी रोजी हिंजवडी येथे घडला.

रवी शंकर सोनकुशरे (वय ४३, रा. हिंजवडी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रवी यांच्या फोनवर एक लिंक आली. त्यावर रवी यांनी क्लिक करून त्यात रजिस्ट्रेशन केले. एक व्हिडीओ लाईक केल्यास ५० रुपये मिळतील असे आमिष त्यात दाखवण्यात आले. त्याला रवी बळी पडले. मात्र पुढे प्रोसेस केली असता त्यात अगोदर पैसे गुंतवावे लागत होते. पैसे गुंतवल्यास अधिक रक्कम मिळेल, असे रवी यांना भरवण्यात आले. रवी यांना सुरुवातीला १६ वेळा रिफंड मिळाला. त्यामुळे त्यांनी ऑनलाईन माध्यमातून १२ लाख २३ हजार ५०० रुपये गुंतवणूक केली. परंतु रिफंड आणि बोनस बाबत विचारणा केली असता आरोपींनी ऑनलाईन माध्यमातून गाशा गुंडाळला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा नोंदवला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.