अधिकारी, कर्मचारी घेतायेत परवानगीविना प्रशिक्षण, उच्चशिक्षणासाठी गेल्यास शिस्तभंगाची कारवाई

0
357

पिंपरी,दि.०९(पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी आस्थापनेवरील वर्ग 1 ते 4 संवर्गातील अधिकारी, कर्मचारी हे सेवा कालावधीत प्रशिक्षण, उच्चशिक्षण, पुढील शिक्षण व अध्ययन रजा परवानगी न घेता करत असून यापुढे परवानगीविना अध्ययन रजा घेत असल्याचे निदर्शनास आल्यास शिस्तभंगाची कारवाईचा इशारा आयुक्त शेखर सिंह यांनी दिला आहे.

वर्ग 1 ते 4 मधील अधिकारी, कर्मचारी सेवा कालावधीतच प्रशिक्षण, उच्चशिक्षण, पुढील शिक्षण व अध्ययन रजा महापालिकेची परवानगी न घेता करत आहेत. यामध्ये शासनाने विहित केलेल्या मान्यताप्राप्त विद्यापिठांखेरीज अन्य संस्थांमध्ये शिक्षण घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पुढे सेवाविषयक गुंतागुंत व समस्या निर्माण होतात असेही निदर्शनास आलेले आहे. याशिवाय ही बाब कार्यालयीन शिस्तीस धरुन नाही. त्यामुळे कार्यालयीन कर्तव्य व जबाबदारीमध्ये बाधा येऊन कार्यालयीन कामकाजावर परिणाम होतो.

महापालिकेच्या अधिनस्त अधिकारी, कर्मचारी यांनी प्रशिक्षण, उच्चशिक्षण, पुढील शिक्षण व अध्ययन रजा घेण्यासाठी शाखाप्रमुखांमार्फत रितसर अर्ज करावेत. शाखाप्रमुखांनी संबंधितांच्या अर्जाचा विचार करावा. तशी स्वयंस्पष्ट शिफारस करुन सामान्य प्रशासन विभागाच्या पूर्व परवानगीला पाठवावेत. सामान्य प्रशासन विभागाने पूर्वपरवानगी दिल्यानंतरच अशा प्रशिक्षण, उच्चशिक्षण, पुढील शिक्षण व अध्ययन रजा घेता येईल. तसेच यापुढे जर अशी परवानगी न घेता अध्ययन रजा घेत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे परिपत्रकात स्पष्ट केले आहे.