अदानी कंपनीतील गुंतवणूक फ्रान्सने थांबवली

0
39

मुंबई, दि. 26 (पीसीबी) : अदानी समूहाचे संस्थापक-अध्यक्ष गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेच्या न्याय मंत्रालयाने ठेवलेल्या लाचखोरीच्या आरोपांनंतर त्यांचे गुंतवणूकदार सावध झाले आहेत. हे आरोप निकाली निघत नाहीत तोपर्यंत अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये नव्याने गुंतवणूक न करण्याचा निर्णय फ्रान्सच्या ‘टोटलएनर्जीज एसई’ या ऊर्जा क्षेत्रातील बलाढ्य कंपनीने सोमवारी जाहीर केला.

‘टोटलएनर्जीज’ ही अदानी समूहाच्या सर्वात मोठ्या परदेशी गुंतवणूकदारांपैकी एक कंपनी आहे. अदानी समूहाच्या अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील ‘अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड’ (एजीईएल) आणि ‘अदानी टोटल गॅस लिमिटेड’ (एटीजीएल) या कंपन्यांमध्ये त्यांनी गुंतवणूक केलेली आहे. मात्र, गुंतवणूक करताना आपल्याला कथित भ्रष्टाचाराच्या तपासाची कल्पना नव्हती असे या कंपनीने स्पष्ट केले आहे.

‘टोटलएनर्जीज’कडून सोमवारी एक निवेदन प्रसृत करण्यात आले. गौतम अदानी आणि त्यांच्या अन्य दोन कार्यकारी अधिकाऱ्यांनी २६५ दशलक्ष डॉलरची कथित लाच दिल्याचे आम्हाला समजले असे त्यात नमूद केले आहे. ‘‘या आरोपांमध्ये ‘एजीईएल’ किंवा ‘एजीईएल’शी संबंधित कंपन्यांचे नाव नाही. अदानी समूहातील व्यक्तींविरोधातील आरोप निकाली लागत नाहीत तोपर्यंत ‘टोटलएनर्जीज’ अदानी समूहामध्ये कोणतीही नवीन गुंतवणूक करणार नाही’’ असे कंपनीकडून सांगण्यात आले.