अदानींच्या आशिर्वादाने निम्मे पुणे अंधारात – अजित गव्हाणे

0
218

चाकण एमआयडीसीसह पुणे, पिंपरीतील ३.५५ लाखांवर वीजग्राहकांना फटका

पिंपरी, दि. 19 (पीसीबी) :- पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या अतिउच्चदाब ४०० केव्ही शिक्रापूर ते तळेगावच्या चारपैकी दोन वीजवाहिन्यांमध्ये गुरूवारी (दि. १८) रात्री ७.१० वाजता अचानक तांत्रिक बिघाड झाला. या पॉवर ग्रीडच्या अतिउच्चदाब ४०० केव्ही वीजवाहिन्यांच्या देखभाल व दुरूस्तीची जबाबदारी असलेल्या अदानी कंपनीकडून बेजबाबदारीचा कळस झाल्यामुळे तब्बल साडेतीन लाख ग्राहकांवर अंधारात राहण्याची वेळ आली. भाजप आणि अदानींच्या आशिर्वादामुळेच हा प्रकार घडला असून भाजपने या प्रकाराची जबाबदारी स्विकारावी व प्रशासनाने अदानी कंपनीवर कडक कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केली आहे.

याबाबत अजित गव्हाणे यांनी पत्रक प्रसिद्धीस दिले असून त्यात म्हटले आहे की, पीजीसीआयएल शिक्रापूर ते पीजीसीआयएल तळेगाव अतिउच्चदाब ४०० केव्ही वीजवाहिन्यांच्या चारपैकी दोन वाहिन्यांमध्ये गुरुवारी (दि. १८) रात्री ७.१० वाजता तांत्रिक बिघाड झाल्यामुळे महापारेषण कंपनीच्या ४०० केव्ही चाकण, २२० केव्ही चिंचवड, २२० केव्ही उर्से, २२० केव्ही चाकण, १३२ केव्ही चाकण, १३२ केव्ही खराडी या अतिउच्चदाब उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद झाला. यात सुमारे ३९६ मेगावॅट विजेचा पुरवठा बंद झाल्यामुळे पुणे शहरातील प्रामुख्याने खराडी, वडगाव शेरी, विमाननगर, येरवडा, धानोरी आदी परिसरातील सुमारे १ लाख २५ हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे.

तर पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरीगाव, चिंचवड, पुनावळे, वाल्हेकरवाडी, वाकड, ताथवडे, किवळे, रावेत, थेरगाव परिसर आणि संपूर्ण प्राधीकरणासह आकुर्डीमधील ५० टक्के परिसरातील २ लाख ३० हजार असे एकूण ३ लाख ५५ हजारांवर ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. यासोबतच चाकण एमआयडीसीमधील उच्च व लघुदाहबाच्या सुमारे ५ हजार औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा बंद पडला. या पॉवर ग्रीडच्या अतिउच्चदाब ४०० केव्ही वीजवाहिन्यांच्या देखभाल व दुरूस्तीची जबाबदारी असलेल्या अदानी कंपनीकडून तात्काळ दुरुस्ती करणे अपेक्षित असतानाही ती करण्यात न आल्यामुळे गुरुवारची संपूर्ण रात्र नागरिकांना अंधारात काढावी लागली.

अदानी समूहाला देखभाल दुरुस्तीचे काम भाजप नेत्यांच्या आशिर्वादाने मिळाले आहे. भाजपचा वरदहस्त असलेल्या या कंपनीने तात्काळ दुरुस्ती करणे अपेक्षित असतानाही त्याकडे दूर्लक्ष केल्यामुळे ऐन उन्हाळ्यात नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. या संपूर्ण प्रकाराची जबाबदारी ही भाजपने नैतिकदृष्ट्या स्विकारावी आणि अदानी कंपनीवर कडक कारवाई करावी, अशी मागणीही गव्हाणे यांनी केली आहे.
पाच हजार कंपन्यांना फटका

अदानी कंपनीच्या नाकर्तेपणाचा तब्बल ५ हजार कंपन्यांना आर्थिक फटका बसला आहे. चाकण, तळेगाव आणि पिंपरी-चिंचवडमधील ५ हजार कंपन्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. जे नुकसान झाले त्याबाबत माहिती घेऊन झालेल्या नुकसानीची जबाबदारी अदानी कंपनीवर निश्चित करावी व ही रक्कम अदानी कंपनीकडून नुकसान झालेल्या कंपन्यांना अदा करण्यात यावी, अशी मागणीही गव्हाणे यांनी केली आहे.