अदानींचा मोठा गोलमाल…! गुपचुप खरेदी केले स्वतःचेच शेअर ?

0
343

देश,दि.३१(पीसीबी) – हिंडेनबर्गच्या अहवालानंतर, आता पुन्हा एकाद गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूहाचे टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. अदानी समूहाने गुपचुप स्वतःचेच शेअर खरेदी करून स्टॉक एक्सचेन्जमध्ये लाखों डॉलर्सची गुंतवणूक केल्याचा दावा एका माध्यम समूहाने केला आहे. ऑर्गेनाइज्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्टचा (OCCRP) हा अहवाल गार्डियन आणि फायनान्शिअल टाईम्ससोबत शेअर करण्यात आला आहे. यात अदानी समूहाने मॉरीशसमध्ये केलेल्या ट्रांझॅक्शंसचे डीटेल्सचा पहिल्यांदाच खुलासा केल्याचा दावाही करण्यात आला आहे.

या अहवालानुसार, समूहातील कंपन्यांनी 2013 ते 2018 या काळात गुपचूप आपलेच शेअर खरेदी केले. एवढेच नाही, तर आपण मॉरीशसच्या मार्गाने ट्रांझॅक्शंस आणि अदानी समूहाचे इंटरनल ईमेल्स बघितल्याचा दावाही या नॉन-प्रॉफिट मीडिया ऑर्गेनायझेशन OCCRP ने केला आहे. किमान दोन प्रकरणं असे आहेत की, गुंतवणूकदारांनी परदेशी कंपन्यांच्या माध्यमाने अदानी समूहाच्या शेअर्सची खरेदी विक्री केल्याचे त्यांच्या तपासातून समोर आल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.

दरम्यान OCCRP च्या गुरुवारी आलेल्या अहवालात नसीर अली शाबान अहली आणि चांग चुंग-लिंग ही दोन नावं घेण्यात आली आहेत. या अहवालात दावा करण्यात आला आहे की, हे लोक अदानी समूहाचे लॉन्गटाइम बिझनेस पार्टनर्स आहेत आणि त्यांनी या अहवालात याच दोन लोकांचा तपास केला आहे. मात्र याच बरोबर, चांग आणि अली यांनी जो पैसा गुंतवला तो अदानी परिवारानेच दिला, याचा कुठलाही पुरावा नाही. पण रिपोर्टिंग आणि डॉक्यूमेंट्सवरून हे स्पष्ट होते की, अदानी समूहात त्यांनी केलेली गुंतवणूक ही अदानी परिवारासोबतच्या सामंजस्याने करण्यात आली होती, असा दावाही या माध्यम समूहाने केला आहे.

हिंडेनबर्गचा अहवाल काय होता ?
अमेरिकन शॉर्ट सेलिंग फर्म हिंडेनबर्ग रिसर्चने जानेवारी महिन्यात अदानी समूहासंदर्भात एक अहवाल प्रसिद्ध केला होता. यात अदानी समूहावर शेअरच्या किमतीत फेरफार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. मात्र अदानी समूहाने हे आरोप फेटाळून लावले होते. आपण नेहमीच नियमांचे पालन केल्याचे त्यांनी म्हटले होते. मातर, या अहवालामुळे अदानी समूहाच्या शेअर्सना मोठा फटका बसला होता. समूहाचे मार्केट कॅप 150 बिलियन डॉलरने घसरले होते. पण आता, अलीकडच्या काळात समूहाच्या शेअर्समध्ये तेजी दिसत आहे.