अतिक्रमण विरोधात महानगरपालिकेकडून कारवाई…

0
184

पिंपरी,दि. १७ (पीसीबी) -‘ पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीमधील मोठ्या रस्त्यालगत, सार्वजनिक ठिकाणी अतिक्रमण, अनधिकृत पत्राशेड व वीट बांधकामांवर महानगरपालिकेकडून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. नागरिकांना सार्वजनिक रस्ते मोकळे करणे, रस्ते, जागा अनधिकृत बांधकामांपासून मोकळ्या करुन देणे हा कारवाईमागील उद्देश आहे. यामुळे सध्या महानगरपालिकेकडून अशा अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणाविरोधात कारवाई करण्यात येत आहे. शहरातील सार्वजनिक जागा नागरिकांच्या सोयीसुविधांच्या दृष्टीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांसाठी, विकासकामांसाठी तसेच सर्वांगीण कल्याणासाठी जतन करणे गरजेचे असून यामुळे शहराच्या सर्वांगीण विकासामध्ये भर पडण्यास मदत होणार आहे. असे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.

शहरातील अनधिकृत व्यवसायिक पत्राशेड धारकांद्वारे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले जात असून रस्त्यावरच वाहने उभी केल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या वाहतूकीस अडथळा निर्माण होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. यामुळे शहराचे विद्रुपीकरण होत असून बकालपणा वाढत आहे. या अडथळ्यांमुळे लहान-मोठे अपघातसुध्दा होत आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनावर आणि शहराच्या पर्यावरणावर परिणाम होत आहे. तसेच अधिकृत बांधकाम इमारतीमधील व्यावसायिक गाळेधारकांवरही अन्याय होत आहे. असे अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील यांनी सांगितले.

इथे झाली कारवाई !

महापालिकेच्या वतीने ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत वाकड ते पिंपळे निलख, जगताप डेअरी चौक ते भुजबळ चौक, तसेच ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत रावेत बीआरटी आणि ‘इ’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्र. ३ मौजे मोशी येथील जय गणेश साम्राज्य चौक ते अलंकापुरम चौक या रस्त्यांलगत असलेल्या अनधिकृत बांधकामांवर अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यात आली. मागील सात दिवस महानगरपालिका अतिक्रमण असलेल्या बांधकामावर कारवाई करित आहे. याकारवाईदरम्यान ४ लाखांपेक्षा अधिक चौरस फूट क्षेत्रफळामध्ये असणारी अनधिकृत पत्राशेड तसेच वीट बांधकामे पाडण्यात आली.

अनधिकृत व्यवसायिकांची पत्राशेड काढणार –
महाराष्ट्र राज्यामधील स्वच्छ सुंदर शहरामध्ये आघाडीवर असणाऱ्या पिंपरी चिंचवड शहराची वेगाने प्रगती होत असून लोकसंख्येमध्येसुध्दा मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. वाढत्या लोकसंख्येच्या सार्वजनिक हिताच्या दृष्टीने शहरातील सर्व प्रमुख रस्ते अडथळे विरहीत असणे गरजेचे आहे. शहरामधील जवळपास सर्वच प्रमुख रस्त्यांवर किंवा रस्त्यालगत अनधिकृत व्यवसायिकांच्या पत्राशेड असल्याने अडथळा निर्माण होत असल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले असून त्याबाबत नागरिकांच्या तक्रारीसुद्धा महापालिकेकडे आल्याने महापालिकेच्या वतीने अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यात येणार आहे., असे महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.

उर्वरित क्षेत्रीय कार्यालयांतर्गतही अतिक्रमणविरोधी मोहिम राबविली जाणार…

नागरिकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आणि शहराचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी अतिक्रमण समस्यांवर तातडीने उपाय करणे आवश्यक असून महापालिका यासाठी कटिबद्ध आहे. नागरिकांसाठी स्वच्छ, सुंदर आणि संघटित शहरी वातावरण निर्माण करण्यासाठी येत्या महिन्याभरात उर्वरित क्षेत्रीय कार्यालयांतर्गतही अशीच अतिक्रमणविरोधी मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील यांनी दिली..