अण्णा बनसोडे यांच्या उमेदवारीवर गदा

0
442

– करोडोची मालमत्ता शपथ पत्रातून दडवली

पिंपरी, दि. 30 (पीसीबी) : पिंपरी विधानसभेचे महायुतीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांची उमेदवारी धोक्यात आली आहे. यासंदर्भात महाविकास आघाडीच्या उमेदवार सुलक्षणा शीलवंत धर यांनी हरकत नोंदवली असून अण्णा बनसोडे यांनी करोडो रुपयाची मालमत्ता शपथपत्रात लपविली असल्याचे पुराव्यानिशी पिंपरी विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव यांच्याकडे सादर केले आहे. उमेदवारांपैकी चंद्रकांता सोनकांबळे, जितेंद्र ननावरे यांनीही याच विषयावर हरकत नोंदवली आहे. दरम्यान, उमेदवारीवर आक्षेप फेटाळून अर्ज मंजूर करण्यात आला.

आता उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे राजरत्न शीलवंत यांनी सांगितले.

सुलक्षणा शीलवंत, सोनकांबळे, ननावरे यांनी आज घेतलेल्या हरकतीमध्ये युतीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांनी चिखली गट नंबर 1596 मधील 60 गुंठे जमीन अण्णा बनसोडे अध्यक्ष असलेल्या सिद्धार्थ मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थेच्या नावावर असल्याचे तसेच चिखली गट क्रमांक 15 93 येथील 41 गुंठे जमीन ही याच सिद्धार्थ मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थेच्या नावावर असल्याचे पुराव्यानिशी सादर केले आहे. सदरचे क्षेत्र सिद्धार्थ मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थेला विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी दिले असून संबंधित सातबारा उतऱ्यावर संस्थेचे अध्यक्ष म्हणून अण्णा दादू बनसोडे यांचे तर, सेक्रेटरी म्हणून सुभाष दादू बनसोडे यांचे नांव नमूद करण्यात आले आहे. त्याचा फेरफार क्रमांक 12399 असा असून 12 जानेवारी 2022 रोजी सिद्धार्थ मागासवर्गीय संस्थेच्या नावावर ही जमीन करण्यात आली आहे.

सुलक्षणा शीलवंत यांनी घेतलेल्या हरकतीमध्ये अण्णा बनसोडे यांनी यापूर्वीही निवडणूक लढविली असून त्याही वेळी शपथपत्रामध्ये अनेक गोष्टी लपविले असल्याचे म्हटले आहे.  या घेतलेल्या हरकतीमध्ये सुलक्षणाशीलवंत यांनी किसन शंकर कठोरे विरुद्ध अरुण दत्तात्रय सावंत व इतर यांच्या संदर्भात दिनांक 9 मे 2014 रोजी माननीय न्यायालयाने दिलेल्या निकालाचा उल्लेख केला आहे. या निकालात जर एखाद्या उमेदवारासंदर्भात पुराव्यानेशी हरकत नोंदवलेली असेल तर त्याचा उमेदवारी अर्ज तात्काळ बाद करण्यात यावा, असे नमूद केल्या असून या निकालानुसार अण्णा बनसोडे यांनी दाखल केलेले शपथ पत्र चुकीचे असून करोडो रुपयांची मालमत्ता त्यांनी लपविले असल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज तात्काळ बाद करावा, अशी मागणी केली आहे.