पिंपरी, दि.२५ (पीसीबी) – भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी हे थोर स्वातंत्र्यसैनिक तसेच लोकशाहीवर निष्ठा असणारे संवेदनशील नेते आणि अजातशत्रू राजकारणी होते शिवाय ते लेखक आणि कवी मनाचे व्यक्तिमत्व लाभलेले मुत्सद्दी मार्गदर्शकही होते असे मत अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती आज साजरी करण्यात आली. पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस आमदार उमा खापरे आणि अतिरिक्त आयुक्त जगताप यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यावेळी जगताप यांनी मत व्यक्त केले.
अभिवादन कार्यक्रमास आमदार उमा खापरे, माजी नगरसदस्य शंकर जगताप, नामदेव ढाके,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक आणि विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
अटल बिहारी वाजपेयी यांनी तीन वेळा भारताचे पंतप्रधानपद भूषवले शिवाय त्याआधी त्यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री म्हणून देखील काम केले. राज्यशास्त्राचे पदवीधर असलेल्या वाजपेयी यांनी लेख आणि कविता लिखाणांबरोबर पत्रकारितेचेही काम केले आहे.त्यांची अनेक पुस्तके, कविता संग्रह प्रकाशित झाले आहेत.१९४२ च्या स्वातंत्र्य संग्रामात त्यांनी सहभाग घेतला होता. उत्तम भाषण शैली आणि अजातशत्रू व्यक्तिमत्वामुळे ते जनमानसात लोकप्रिय होते. भारत सरकारने वाजपेयी यांच्या उत्तम कामगिरीबद्दल २०१४ मध्ये त्यांना भारतरत्न हा किताब देऊन गौरव केला होता. देशासाठी सर्वोच्च प्रतीचे काम करणा-या आणि भारताची कीर्ती जगभरात वृद्धिंगत करणाऱ्या व्यक्तीस भारतातील सर्वोच्च भारतरत्न हा सन्मान दिला जातो.तसेच त्यांना पद्मविभूषण किताब देऊनही गौरविण्यात आले होते.
भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती सर्व शासकीय कार्यालयांमध्ये आज साजरी करण्यात येते.