अजित पवार सहाव्यांदा उपमुख्यमंत्री

0
23

मुंबई, दि. 05 (पीसीबी) : देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे विरोधकांकडून सातत्याने ईव्हीएमच्या मुद्द्यावरून महायुतीला लक्ष्य केलं जात असताना दुसरीकडे फक्त मुख्यमंत्री व अजित पवारांचं उपमुख्यमंत्रीपद वगळता अद्याप इतर कोणत्याही पदाची वा व्यक्तीची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे महायुतीमध्ये सत्तावाटपावरून प्रचंड संभ्रम असल्याचं बोललं जात आहे. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात असतानाच आता ठाकरे गटाकडून मोठा दावा करण्यात आला आहे.

अजित पवारांवर वेगळ्या जबाबदाऱ्या?
शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे खासदार व मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी अजित पवार यांच्याबाबत मोठा दावा केला आहे. दिल्लीत पत्रकारांशी बोलताना संजय राऊतांनी अजित पवारांनी दिल्लीशी जुळवून घेतल्याचा दावा केला. “अजित पवारांचं राजकारण वेगळं आहे. त्यांनी दिल्लीशी चांगल्या प्रकारे जुळवून घेतलं आहे अशी माझी पक्की माहिती आहे. त्यांच्यावर विशिष्ट अशा जबाबदाऱ्या टाकल्या आहेत, तेही मला माहिती आहे”, असं संजय राऊत म्हणाल्यामुळे तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

एकनाथ शिंदे पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री होणार नाहीत, असं संजय राऊत म्हणाले आहेत. “एकनाथ शिंदे १०० टक्के आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. त्यांच्यात शपथ टाळण्याची हिंमत आहे का हे तपासावं लागेल. दिल्लीशी पंगा घेण्याची हिंमत या क्षणी त्यांच्यात नाही. कारण अडीच वर्षांपूर्वी ती हिंमत नव्हती म्हणून त्यांनी पक्ष सोडला. आज तिघांनी शपथ घेतली, तर उरलेलं मंत्रीमंडळ स्थापन करण्यासाठी त्यांना बराच वेळ मिळतो. त्यांना मंत्रीमंडळात राहावंच लागेल. सत्तेशिवाय काही माणसं राहू शकत नाहीत”, असं राऊत म्हणाले.

“शिंदेंचा इरा आता संपला आहे. त्यांची गरज होती, ती पूर्ण झाली आहे. आता त्यांना फेकून दिलं आहे. आता एकनाथ शिंदे या राज्यात कधीच मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत. हे लोक शिंदेंचा पक्षही तोडू शकतात. भाजपाचा हा इतिहास आहे की जे त्यांच्यासोबत काम करतात त्यांचा पक्ष ते फोडतात. बहुमतानंतरही इतक्या दिवसात सरकार स्थापन होत नाही याचा अर्थ महायुतीमध्ये काहीतरी गडबड आहे. ही गडबड उद्यापासून आपल्याला पाहायला मिळेल”, असं ते म्हणाले.

पुढची पाच वर्षं धुमशान – राऊत
दरम्यान, सत्तास्थापनेला लागत असलेला उशीर पाहता पुढची पाच वर्षं धुमशान होईल, असा अंदाज संजय राऊतांनी वर्तवला आहे. “महाराष्ट्रात पुढची पाच वर्षं आपल्याला धुमशान पाहायला मिळणार आहे. त्याची तयारी महाराष्ट्रानं ठेवावी. यात महाराष्ट्राचं हित किती, अहित किती हे आता पाहायला मिळेल”, असं ते म्हणाले. “बहुमत असून १२ दिवस मुख्यमंत्री शपथ घेऊ शकले नाहीत. अंतर्गत लाथाळ्या, रुसवे-फुगवे जनतेनं पाहिले”, अशी टीका त्यांनी केली.

देवेंद्र फडणवीसांना आवाहन
दरम्यान, यावेळी संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना आवाहन केलं. “राज्याच्या परंपरेप्रमाणे आम्ही फडणवीसांना शुभेच्छा देतो. जोपर्यंत तुम्ही त्या पदावर आहात, तोपर्यंत हे राज्य काळजीपूर्वक सांभाळण्याची आणि त्याची लूट होऊ न देण्याची जबाबदारी तुमची आहे. गेल्या अडीच-तीन वर्षांत महाराष्ट्राची लूट झाली. इथला रोजगार, उद्योग, संपत्ती, सार्वजनिक उपक्रम या सगळ्यांवर दरोडे पडले. ही दरोडेखोरी थांबवून महाराष्ट्राला पुन्हा वैभवशाली राज्य बनवण्याची जबाबदारी महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांवर आहे. त्यांनी असं कार्य केलं, तर महाराष्ट्र त्यांची एक चांगला मुख्यमंत्री म्हणून नोंद ठेवेल”, असं राऊत म्हणाले