अजित पवार यांना काळे झेंडे दाखवले

0
223

माढा, दि. २३ (पीसीबी) – मराठा आंदोलनाची धग आता राज्य सरकारमधील मंत्र्यांना बसू लागली आहे. अनेक गावांतून राजकारण्यांना प्रवेश बंदीचे फलक लागलेत, तर मंत्रीमंडळातील मंत्र्यांची ठिकठिकणी अडवणूक, घेराव असे प्रकार सुरू झाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच त्याचा अनुभव आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी मराठा समाज जास्तच आक्रमक झाला आहे. याचे पडसाद आज माढ्यात पाहायला मिळाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माढ्यातील सभेत मराठा आंदोलकांनी गोंधळ घातल्याची माहिती समोर आली आहे.

माढ्यातील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगामाचा अजित पवार यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. या वेळी हा प्रकार घडला. सकल मराठा समाजाच्या आंदोलकांनी अजित पवार यांना काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी केली. यामुळे काही वेळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. ‘एक मराठा लाख मराठा’ अशी घोषणाबाजी करत आंदोलकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. गोंधळ घालणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

अजित पवार यांच्या कार्यक्रमाला सकल मराठा समाजाने आधीच विरोध केला होता. आधी आरक्षण द्यावे मगच राजकीय कार्यक्रम घ्यावेत, असंही समाजाच्या वतीने इशारा देण्यात आला होता. पण अजित पवार यांचे भाषण सुरू होताच काही मिनिटांतच आंदोलकाने काळा झेंडा दाखवत घोषणाबाजी केली. पोलिसांचा कडेकोट बंंदोबस्त असतानाही हा प्रकार घ़डला
अजित पवार म्हणाले, आघाडीच्या काळात मराठा आरक्षण उच्च न्यायालयात टिकले नाही. फडणवीसांनी टिकणारे आरक्षण दिले, पण ते सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही. पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय झाला होता. ५२ टक्के आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण देण्याचा आमचा प्रयत्न आहे. पण आरक्षण टिकले नाही तर लोक आम्हालाच बोलतील. आधीच्या आरक्षणाला धक्का लागू नये ही सर्वांची इच्छा आहे.