
दि.२८(पीसीबी) – पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकिसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराचा शुभारंभ आज रविवारी सायंकाळी सात वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते तळवडे आणि चिखली येथील सभांतून होणार आहे.
प्रभाग १ मधून विकास साने, यश साने, साधना नेताजी काशिद, संगित प्रभाकर ताम्हाणे आणि प्रभाग १२ मधून सिमा धनंजय भालेकर, शरद भालेकर, पंकज भालेकर, चारुलता सोनवणे या आठ उमेदवारांच्या प्रचारार्थ ही सभा आहे.
भाजप आमदारप महेश लांडगे यांच्या पारंपरीक भोसरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या प्रचाराची सुरवात होत असल्याने ती अत्यंत महत्वाची समजली जाते. महापालिका निवडणुकिला वळण देणारी ही सभा ठरणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार या सभेत काय बोलणार याकडे भाजपसह दोन्ही राष्ट्रवादी आणि दोन्ही शिवसेना नेते कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे. सलग २० वर्षे निर्विवाद सत्ता असतानाही २०१७ मध्ये ४० नगरसेवक फोडून भाजपने अजित पवार यांची सत्ता हिसकावून घेतली होती त्याची सल दादांना आहे. काही झाले तरी यावेळी सर्व ताकद लावून महापालिका मिळवायचीच असा निश्चय पवार यांनी केला असून पूर्ण तयारीने ते मैदानात उतरले आहेत. गेल्यावेळच्या पराभवाचे उट्टे काढायचे म्हणून उमेदवार निवडतानाही त्यांनी अत्यंत सुक्ष्म अभ्यास, सर्वेक्षणांअंती दमदार कार्यकर्त्यांनी संधी दिली.
आजच्या प्रचार सभेत कदाचित भाजपची २०१७ ते २०२२ दरम्यानच्या सत्ता काळातील अनागोंदी, पुढे २०२२ ते २०२५ पर्यंत प्रशासकीय काळातील भयंकर भ्रष्टाचार हा प्रचाराचा मुख्य मुद्दा असण्याची शक्यता आहे. भाजप काळातील भ्रष्टाचाराची शेकडो प्रकरणे या प्रचारात चर्चेला येणार असल्याचे समजते. शहर विकास आराखडा तयार करताना सामान्य जनतेच्या घरावर रस्ते तसेच स्थानिक भूमिपुत्रांच्या शेतजमिनींवर आरक्षणे टाकली मात्र, बिल्डरच्या जमिनी अचूकपणे वगळण्यात आल्या. चिखली-कुदळवाडी आणि चऱ्होली येथे हजारो एकरांवर टाऊन प्लॅनिंगचे (TP) आरक्षण टाकले होते ते जनमत विरोधात गेल्याने हटवण्याची नामुष्की भाजपवर आली. शहरातील SRA चे ९२ प्रकल्पातील गैरव्यवहार तसेच पवना, इंद्रायणी आणि मुळा या नद्यांचे प्रदुषण व वादग्रस्त ठरलेला नदी सुधार प्रकल्प हासुध्दा प्रचारात येण्याची शक्यता आहे.
चिखली-कुदळवाडी परिसरात फेब्रुवारीत ४५०० अतिक्रमणे पाडली आणि १२०० लघुउद्योजकांचे कारखाने भुईसपाट केले. बांगलादेशी घुसखोर असल्याचे कारण देऊन कारवाई केली मात्र, एकही घुसखर सापडला नाही.महापालिकेची आर्थिक दिवाळखोरी हा मुद्दासुध्दा कळीचा ठरणार आहे. अजित पवार यांच्या काळात तब्बल ५००० कोटींच्या ठेवी होत्या त्या संपल्या आणि आज सुमारे पाच हजार कोटींची देणेदारी झाली तसेच १५ हजार कोटींना महापालिका कर्जबाजारी आहे. अशा सर्व विषयावर अजित पवार काय बोलतात ते पहाचे.









































