अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांचा राजीनामा

0
3

दि . १४ ( पीसीबी ) – राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. अजित पवार यांना पत्र लिहित त्यांनी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. दीपक मानकर यांच्याविरोधात काही दिवसांपूर्वी समर्थ पोलीस स्टेशनमध्ये खोटे कागदपत्र सादर केल्यासंदर्भात गुन्हा दाखल झाला होता. हे पाहता त्यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे.

दीपक मानकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल होताच त्यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. ‘माझा वाढता राजकीय आलेख पाहता, काही समाजकंटकाकडून माझी राजकीय बदनामी केली जात आहे. मी काही वर्षांपूर्वी केलेल्या जमिनीच्या आर्थिक व्यवहारात आता ३-४ दिवसांपूर्वी या जमिनीच्या आर्थिक व्यवहारात शासनाची फसवणूक केली असल्याचा माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. परंतु हा गुन्हा अजून सिद्ध झालेला नाही. सदर गुन्ह्यातील सत्यता न पडताळता येणाऱ्या महानगपालिका निवडणूक पाहता तसेच माझी राजकीय कारकीर्द मलीन करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे,’ अशी प्रतिक्रिया मानकर यांनी दिली आहे.

दीपक मानकर यांनी असेही नमूद केले की, ‘आर्थिक व्यवहार हा माझ्या जमिनीसंदर्भात झालेला असून त्यामध्ये माझ्याकडून कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार किंवा फसवणुकीचा प्रकार झालेला नाही. या प्रकरणामुळे आपल्या पक्षाची व आपली नाहक बदनामी होत असून त्यामुळे पक्षश्रेष्ठींना अनेक गोष्टींना सामोरे जावे लागत आहे.’

दीपक मानकर यांनी पत्रात म्हटले की, ‘आदरणीय दादा, आपण आणि प्रदेशाध्यक्ष खा. श्री. सुनील तटकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद कायम ठेवण्यासाठी मी अध्यक्ष झाल्यापासून प्रामाणिक प्रयत्न करीत आलेलो आहे. तरी आपणास नम्र विनंती करतो की, माझा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर अध्यक्ष पदाचा राजीनामा मंजूर करण्यात यावा.’