अजित पवार यांच्याकडून राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांना ४० महागड्या गाड्यांची भेट

0
454

मुंबई, दि. २८ (पीसीबी) : शरद पवार यांच्यापासून फारकत घेत राष्ट्रवादीतील आमदारांचा मोठा गट अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली सत्तेत सामील झाला होता. सत्तेत सामील झाल्या दिवसापासून अजित पवार यांच्याकडून त्यांच्या गटातील आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना शक्य त्या मार्गाने बळ दिले जात आहे. पुण्यात निधीवाटपात अजितदादांच्या गटातील आमदारांना झुकते माप मिळाल्याच्या मुद्द्यावरुन शिंदे गट आणि भाजपचे कार्यकर्ते नाराज झाल्याची माहिती नुकतीच समोर आली होती. मात्र, अजित पवार हे आपल्या गटाचे वर्चस्व सिद्ध करण्याची किंवा वरचष्मा राखण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. याचाच एक भाग म्हणून आता अजित पवार गटाकडून आपले जिल्हाध्यक्ष आणि महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना एक महागडी भेट दिली जाणार आहे. अजित पवार गटाकडून या सगळ्यांना महागड्या गाड्या देण्यात येणार आहेत.
नवीनतम स्मार्ट टीव्हीसह सुट्टीचा आनंद स्वीकारा- 55% पर्यंत सूट

अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक जिल्हाध्यक्षाला कार देण्याची घोषणा केली होती. जेणेकरुन आपापल्या भागात फिरण्यासाठी आणि पक्षाच्या प्रचारासाठी त्यांना या गाडीचा वापर करता येईल. ही घोषणा आता प्रत्यक्षात अंमलात येणार असून अजित पवार यांच्या गटाकडून महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या स्कॉर्पिओ आणि बोलेरो गाड्यांची टेस्टिंग सुरु आहे. अजित पवार गटाच्या मंत्रालयासमोर असलेल्या पक्षकार्यालयात काही गाड्या टेस्ट ड्राईव्हसाठी आणण्यात आल्या होत्या. सूत्रांच्या माहितीनुसार, अजित पवार गटाकडून आतापर्यंत ४० गाड्यांचे बुकिंग करण्यात आले आहे. याशिवाय, आणखी ६० गाड्या लवकरच खरेदी केल्या जाणार आहेत. या स्कॉर्पिओ आणि बोलेरो गाड्यांची किंमत साधारण १० लाख ते २२ लाख इतकी असल्याचे समजते. आपल्या गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवून पक्ष बळकट करणे आणि आपला पक्ष हीच खरी राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा संदेश अजित पवारांना या माध्यमातून द्यायचा असल्याची चर्चा आहे. नव्या गाड्या मिळाल्यानंतर जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त फिरुन पक्षाची भूमिका लोकांपर्यंत पोहोचवणे, अजित पवारांना अपेक्षित असल्याचेही समजते.

अजित पवार गटाकडून Scorpio N 4Xplor आणि Bolero Neo या गाड्यांची खरेदी केली जाणार आहे. बोलेरो निओ गाडीची किंमत साधारण १० ते १२ लाख इतकी आहे. तर स्कॉर्पिओ एन 4Xplor गाडीची किंमत १६ ते २२ लाख इतकी आहे. शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागात जिल्ह्याची व्याप्ती जास्त असल्याने कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना जास्त फिरावे लागते. त्यामुळे शहरातील जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांना बोलेरो निओ ही गाडी दिली जाऊ शकते. तर ग्रामीण भागातील जिल्हाध्यक्षांना स्कॉर्पिओ गाड्या दिल्या जातील, अशी माहिती आहे. पहिल्या टप्प्यात राज्याच्या ३६ जिल्ह्यांमधील सर्व जिल्हाध्यक्षांना गाड्या दिल्या जातील. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रवादीतील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना गाड्या दिल्या जातील. यासाठी अजित पवार गटाकडून तब्बल १०० गाड्या खरेदी केल्या जातील.