अजित पवार यांचे तुफानी भाषणामुळे राष्ट्रवादी जोशात थर्ड आय – अविनाश चिलेकर –

0
348

महाआघाडी सरकारचे उपमुख्यमंत्री असताना अजित पवार यांचे दोन-तीन दौरे शहरात झाले होते. पण काल-परवा म्हणजे शनिवारी विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी केलेले जे तडाखेबंद भाषण होते ते आजवरचे अत्यंत कडक भाषण होते. `भाजपाने लोकशाहिचा मुदडा पाडला, खून केला`, `सचिवांनाच सगळे अधिकार द्यायचे तर तुम्ही दोघे घरी बसाना`,`करदात्यांचंया पैशावर यांनी डल्ला मारला`, अशा शेलक्या शब्दांत अजित पवार भाजपावर बरसले. आजवर त्यांचे अनेक भाषणे एकली, पण हे तासाभराचे भाषण कार्यकर्त्यांना चेतवणारे होते. महापालिकेतील भ्रष्टाचारी भाजपाच्या कारभाराचा येत्या निवडणुकीत पंचनामा हाच राष्ट्रवादीचा एकमेवर अजेंडा असणार हे आता स्पष्ट झाले. यावेळचा कार्यकर्त्यांचा जल्लोष, उत्साह तसेच भाऊसाहेब भोईर, रविकांत वरपे, अजित गव्हाणे यांची भाषणे खूप बोलकी होती. भोईर यांच्या भाषणातून बोध घेतला पाहिजे. पाच वर्षांत झोपी गेलेली राष्ट्रवादी आता कुठे खडबडून जागी झाली आणि एक्शन मोडमध्ये आल्याचे दर्शन झाले. अजित पवार यांच्या निमित्ताने निर्धार मेळाव्यातून तीन तासात जी काही भाषणे आणि शक्तीप्रदर्शन झाले त्यातून उद्या निवडणुका केव्हाही होऊ देत राष्ट्रवादी लढाईसाठी पूर्ण तयारीत असल्याचे लक्षात आले.

आमदार महेश लांडगे यावर काय बोलणार –
अजित पवार आगामी महापालिका निवडणूक प्रचारात कोणते मुद्दे मांडणार ते परवाच्या भाषणातून उलगडले. राष्ट्रवादीला बदनाम करून सत्तेत आल्यानंतर पाच वर्षांत भाजपाने किती खाल्ले यांची कुंडलीच आता राष्ट्रवादीने तयार केली आहे. स्मार्ट सिटी मध्ये अर्बन स्ट्रीटच्या नावाखाली ४५ मीटरच्या रस्त्याला दुतर्फा भले मोठे फूटपाथ करून ते रस्ते २४ मीटर पर्यंत कमी केले. कारण अर्बन स्ट्रीट फूटपाथमध्ये प्रती किलोमीटरचा खर्च ३०-३५ कोटी आहे आणि त्यातून कोट्यवधींची मलई नगरसेवकांनी लाटली. अवैध होर्डींग्जच्या ठेक्यात भाजपा सरचिटणीसानेच सात कोटींची लूट केली. कागदोपत्री वृक्षगणना करणारा महाभागा भाजपाचाच पदाधिकारी आहे. हजारावर बोगस कंत्राटी कामगारांचे ठेके भाजपाच्या बड्या नेत्यांकडेच आहेत. मैला सांडपाणी शुध्दीकरण, सुरक्षारक्षकांपासून, १५० उद्यानांची देखभाल ठेकेसुध्दा याच नगरसेवकांच्या पाहुण्यारावळ्यांकडे आहेत. सिमेंट रस्त्यांची कामे आमदारांच्या भाच्यांकडे, तर मोशी कचरा डेपोचे २०-२५ कोटींचे दुकान दुसऱ्या आमदाराकडे सांभआळायला आहे. यांत्रीक पध्दतीने कचरा गोळा करण्याच्या ठेक्यात टनाला १०० रुपये दलाली मागणारे दोन नगरसेवक भाजपाचेच असल्याचे जगजाहीर आहे. ५०० वर जिल्हा परिषद शिक्षकांना महापालिकेकडे वर्ग कऱण्यासाठी भाजपा आमदाराच्या भावाने सुमारे सात कोटी गोळा केल्याचा घोटाळा काय आहे ते संबंधीत त्रस्त शिक्षकांनीच आता राष्ट्रवादीला कथन केले आहे. पंतप्रधान आवास योजनेचा घोटाळा पूर्वीच्या झोपडपट्टी पुनर्वसनापेक्षा मोठा आहे. अनधिकृत बांधकामे नियमितीकरण आणि शास्तीकर माफीचे ठोस आश्वासन देऊन सत्ता मिळविणाऱ्या भाजपाला पाच वर्षांत तो प्रश्न सोडविता आलेला नाही. रेडझोन ची हद्द कमी करणाऱ अशी वारंवार आश्वासने दिली, संरक्षण मंत्र्यांसह भेटागाठीचा फार्स केला मात्र पाच लाख लोकांच्या डोक्यावरची टांगती तलवार काही हटली नाही. आमदारांनी प्राधिकरणाचे पीएमआरडीए मध्ये विलिनीकऱणाला कडवा विरोध दर्शविला, कारण आरक्षणातले बहुतांश भूखंडांवर त्यांचा डोळा होता. प्राधिकरणातील नागरिकांना ९९ वर्षांचे लीज रद्द करून त्यांचे भूंखंड फ्री होल्ड करुन देण्यात यांना रस नव्हता. पवना जलवाहिनीच्या मुद्यावर अजित पवार यांना धु धु धुतले, पण पाच वर्षांत त्या प्रश्नावरही तसूभरसुध्दा पुढे गेले नाहीत. अवघ्या पाच वर्षांत भाजपाच्या तब्बल १०० वर अपराधांचा घडा भरला आहे. अजित पवार आणि त्यांची फौज आता हेच मुद्दे घेऊन भाजपा आमदारांना जाब विचारणार आहे. आमदार लक्ष्मण जगताप यांचे प्रकृती स्वास्थ ठिक नसल्याने त्यांना विश्रांती आहे, मग आता आमदार महेश लांडगे या प्रश्नांची उत्तरे देणार आहेत का ?

बारामती की नागपूर –
पिंपरी चिंचवडच्या विकासातील अजित पवार यांचे योगदान कोणीच नाकारू शकत नाही. गेल्या वीस वर्षांत शहरातील रस्ते, पूल, उड्डाणपूल, उद्याने, चौकावर त्यांचेच नाव कोरले आहे. बारामती पेक्षा पिंपरी चिंचवड शहरावर त्यांचे बारीक लक्ष असते. जेएनएनयूआरएम किंवा स्मार्ट सिटी मध्ये शहराची निवड करण्याचे श्रेयसुध्दा त्यांनाच जाते. गल्ली ते दिल्ली अडलेली कामे त्यांनी मार्गी लावली. जे कोणी महापौर, चेअरमन झाले त्यात अजितदादांची पारख होती. इतके होऊनही त्यांच्या मुलाला पार्थला मावळ मधून लोकसभेला पराभूत व्हावे लागले. नुकताच राज ठाकरे यांनी एका जाहिर मुलाखतीत हा दाखला दिला होता. शहरातील नेते, कार्यकर्ते यांच्याशी अजित पवार यांचे सूत जमले तितके भाजपाला शक्य झाले नाही. कोणाचे लग्न, मयत असू देत किंवा उद्याघटान सोहळा अजित पवार हजर असतात. गेल्या पाच वर्षांत भाजपाची सत्ता असताना शहरात देवेंद्र फडणवीस किती वेळा आले, राज्य सरकारने अथवा केंद्राने शहरासाठी काय दिले याचा लेखोजाखा आता लोकच माडत आहेत. फडणवीस यांनी त्यांचे सर्व अधिकार आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांना दिले. त्यांनी कुठे कशी कशी मनमानी केली तोच आता राष्ट्रवादीच्या प्रचाराचा मुद्दा आहे. शहरातील या मातीतले नेतृत्व हवे म्हणून लोकांनी तो बदल केला होता, पण सामान्य नागरिकांच्या पदरी निराशाच आली. फडणवीस आता प्रचाराला आले तर लोकांना त्याची उत्तरे द्यावी लागतील. एक पोलिस आयुक्तालय सोडले तर स्वतंत्र शहर म्हणून भाजपाने पिंपरी चिंचवडसाठी काय केले हा प्रश्न आहे. तुलना होणार आणि त्यात भाजपाकडे उत्तर नाही. आपला माणूस म्हणून लोक अजित पवार यांच्याकडे पाहतात. बारामती की नागपूर असा विचार होतो त्यावेळी लोक आता तरी बारामती म्हणतात. जगताप, लांडगे यांना या शहराची एकहाती सत्ता हातात असताना सर्वसमावेशक असे नेतृत्व करण्याची खूप मोठी संधी होती, ती त्यांनी गमावली आहे. भ्रष्टाचारमुक्त, दहशतमुक्त कारभाराचे स्वप्न भंगले आहे. घोडेमैदान जवळ आहे.