मुंबई, दि. १७ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोर अजित पवार यांनी मंत्र्यांसह शरद पवार यांची रविवारी (ता. १६) आणि सोमवारी(ता. १७) भेट घेतली. यामुळे रजकीय वर्तुळातून विविध चर्चांना उधाण आले आहे. यातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी वर्षभरात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही एक होतील, असे सूचक वक्तव्य केले आहे.
प्रकाश आंबेडकर पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांनी राज्यातील राजकारणाचा उहापोह केला. आंबेडकर म्हणाले, “राज्यात सध्या शिंदे-फडणवीस-पवारांची चर्चा आहे. त्यांच्या गोंधळात शेतकरी सगळ्यात शेवटी गेला आहे. सरकारला सामान्य जनतेचे, शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे काहीही पडलेले नाही.”
राष्ट्रवादी काँग्रेसचे बंड औटघटकेचे ठरणार असल्याचेही सूचक वक्तव्य यावेळी प्रकाश आंबेडकरांनी केले. ते म्हणाले, “अजित पवारांना यंदा एकट्यालाच दिवाळी साजरी करावी लागणार आहे. पुढील वर्षी मात्र ते कुटुंबात दिवाळी साजरी करतील, अशी आपण अपेक्षा धरू.” यातून वर्षभरातच अजित पवारांचे बंड थंड होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकदा एकत्र येण्याची शक्यता आंबेडकरांनी व्यक्त केली आहे.
आंबेडकर यांनी भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणावरही टीका केली. आंबेडकर म्हणाले, “भाजपला राज्यातील लोकसभेच्या सर्व ४८ जागा जिंकायच्या आहेत. त्यासाठी राज्यात त्यांना विरोधकच नको आहेत. यातूनच राज्यात फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. दुर्दैवाने हे विरोधकांच्या लक्षात येत नाही.”










































