अजित पवार यांचा रक्ताने काढलेला फोटो चर्चेत

0
1

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात बुधवारी मृत्यू झाला. या बातमीमुळे बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे. अजित पवार बुधवारी सकाळी मुंबईहून बारामतीला विमानाने येत होते. त्यावेळी धावपट्टीवर विमान उतरण्यापूर्वी क्रॅश लँडिंग झालं. विमानाचा स्फोट झाला आणि अजित पवारांसह विमानातले पाचही जण ठार झाले. अजित पवारांचं पार्थिव बुधवारी आणि गुरुवारी विद्या प्रतिष्ठान बारामती या मैदानात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. याच ठिकाणी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अलोट जनसागर जमला होता. त्यावेळी एका फोटोने लक्ष वेधून घेतलं.

अजित पवार यांचं लोकांवर आणि लोकांचं त्यांच्यावर प्रेम होतं, आहे आणि राहिल याची साक्ष पटवणारा एक फोटो समोर आला आहे. हा फोटो अजित पवार यांचा आहे. हा फोटो इतर फोटोंपेक्षा वेगळा ठरला आहे कारण हा फोटो रक्ताने काढून या ठिकाणी आणण्यात आला. ब्रिजमोहन पाटील यांनी हा फोटो पोस्ट केला आहे. दादांचे कार्यकर्त्यांना कसे वेड लावले होते याचे हे उदाहरण आहे. बार्शीतील कार्यकर्त्यांने स्वतःच्या रक्ताने काढलेले हे चित्र. आज बारामतीत प्रत्येक जण म्हणतोय आता आमच काय होणार ? आमचे भविष्य काय? याचं उत्तर आत्ता कोणीकडेच नाही. अशी पोस्ट ब्रिजमोहन पाटील यांनी केली आहे.

कुणी काढला आहे हा फोटो?
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बार्शी येथील कार्यकर्त्याने हा फोटो काढला आहे. हा फोटो सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे. अजित पवार हे त्यांच्या रोखठोक शैलीसाठी प्रसिद्ध होते. त्यांच्या कामाचा उरक प्रचंड होता. त्यामुळे त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रातील एक दिलखुलास आणि प्रांजळ नेता हरपला आहे अशी भावना कार्यकर्त्यांच्या मनात आहे. अजित पवारांचा रक्ताने काढलेला हा फोटो त्याचीच साक्ष देतो आहे यात शंका नाही.

अजित पवार यांचं अपघाती निधन
अजित पवार खासगी विमानाने काल (२८ जानेवारी) सकाळी मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले होते. यावेळी बारामती विमानतळावर लँडिंगदरम्यान विमानाचा अपघात झाला. यामध्ये अजित पवारांसह ५ जणांचा मृत्यू झाला. सकाळी ८.४५ च्या दरम्यान ही सगळी घटना घडली. ज्यामुळे अवघा महाराष्ट्र हळहळा. अजित पवारांनी अशी अकाली एक्झिट घेतली त्यामुळे महाराष्ट्र शोकसागरात आहे. एक दिलखुलास, हरहुन्नरी आणि हजरजबाबी नेता महाराष्ट्राने गमावला आहे.