मुंबई, दि. २४ (पीसीबी) अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासूनच त्यांच्या मुख्यमंत्रीपदाची चर्चा सुरू आहे. त्यांच्या वाढदिवशीही त्यांच्या भावी मुख्यमंत्रीपदाची पोस्टर्स लागली होती. त्यामुळे अजितदादा मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यात राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करत या चर्चांना फोडणी दिली. त्यानंतर काल राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील आणि राज्याचे मंत्री धर्मरावबाब आत्राम यांनी अजित पवार हे मुख्यमंत्री होणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाची चर्चा अधिकच जोर धरू लागली आहे. या चर्चा झडत असतानाच आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी तर अजितदादा मुख्यमंत्री होणार की नाही हे फक्त तीनच लोक सांगू शकतील असं विधान केलं आहे. तसेच या तिन्ही लोकांची नावेही सांगितली आहेत.
प्रकाश आंबेडकर हे मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी मोठं विधान केलं आहे. अजित पवार मुख्यमंत्री होतील की नाही हे तीनच लोकं सांगू शकतात. एक पंतप्रधान नरेंद्र मोदी, दुसरे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि खुद्द अजित पवार हे तीन लोकं या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतील. चौथा माणूस यावर उत्तर देऊ शकणार नाही, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.
यावेळी त्यांनी निधी वाटपातील भेदभावावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. तीन पक्षातील आमदारांना निधी कमी देऊन चालणार नाही. भाजप, राष्ट्रवादी आणि शिंदे गटातील आमदारांना जर निधी मिळाला नाही तर भांडण होणार. मात्र शरद पवार गट आणि काँग्रेस आमदारांना निधी कमी पडला तर काही फरक पडत नाही, असं ते म्हणाले.
कोरेगाव भीमा प्रकरणावरही त्यांनी भाष्य केलं. कोरेगाव भीमा दंगलीच्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 40 किलोमीटरच्या परिसरात होते. त्यांना दंगलीची माहिती होती का? हे पाहावे लागेल. कुणीतरी जाणीवपूर्वक माहिती दाबली का?, असा सवाल त्यांनी केला आहे. त्यांच्या या विधानाने खळबळ उडाली आहे.
इंडिया आघाडीवर बोलणार
विरोधी पक्षांची बंगळुरू येथे बैठक झाली. त्यात त्यांनी इंडिया नावाने नवीन आघाडी स्थापन केली आहे. त्याबाबत आंबेडकर यांना विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी उत्तर देण्यास नकार दिला. विरोधी पक्षाने मोदींच्या विरोधात तयार केलेल्या आघाडीला इंडिया नाव दिले आहे. त्यावर लवकरच मी प्रेस घेऊन बोलणार आहे, असं त्यांनी सांगितलं.