अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत ही तर गल्लीपासून दिल्लीपर्यंत प्रत्येकाची इच्छा !!!

0
238

मुंबई, दि. २४ (पीसीबी) – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसा निमित्ताने राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक ट्विट केलं. या ट्विटमध्ये त्यांनी अजित पवार यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केला. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्रीपदी कायम राहणार असल्याचं शिंदे गटाकडून वारंवार सांगितलं जात आहे. मिटकरी यांचं विधान हे त्यांची वैयक्तिक भावना असल्याचंही सांगितलं जात आहे. मात्र, आता खुद्द सरकारमधील एका मंत्र्यानेच अजितदादा यांच्या मुख्यमंत्रीपदावर भाष्य करून राजकीय चर्चांना हवा दिली आहे.

राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना मोठं विधान केलं आहे. अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत ही फक्त अमोल मिटकरी यांची इच्छा नाही. गल्लीपासून दिल्लीपर्यंत प्रत्येकाची इच्छा आहे. दिल्लीतील अनेक नेत्यांना अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत असं वाटतं. माझीही तीच इच्छा आहे, असं मोठं विधान अनिल पाटील यांनी केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत ही आमची सर्वांचीच इच्छा आहे. पण त्यासाठी 145 आमदारांचा आकडा लागतो. तो आकडा आम्ही गाठला तर अजितदादा हेच शंभर टक्के मुख्यमंत्री होतील. पण सध्या तरी आमच्याकडे हा आकडा नाही. म्हणून आम्ही एकनाथ शिंदे यांच्या पाठी उभे आहोत. त्यामुळे आमचं सरकार सुरू आहे. माझी इच्छा असण्याचा प्रश्नच नाही. पण दिल्लीतील प्रत्येक नेत्यांना दादा मुख्यमंत्री झाले पाहिजेत असं वाटत आहे. आता दिल्लीतील कोणकोणते नेते आहेत, हे मला स्पष्ट करण्याची गरज नाही, असं सूचक विधानच अनिल पाटील यांनी केलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटले हा निव्वळ योगायोग होता. त्यांचा दौरा दौरा पूर्वनियोजित होता. पंतप्रधानांना लगेच भेटता येत नाही. कमीत कमी 15 दिवस आधी अपॉइंटमेंट घ्यावी लागते. तशी त्यांची अपॉइंट झाली फिक्स झाली असेल, असंही त्यांनी सांगितलं. राष्ट्रवादीच्या नेत्यांना अधिक निधी मिळाल्याच्या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. राष्ट्रवादीच्या लोकांना जास्त निधी मिळणं हा निव्वळ गैरसमज असेल. मला तर असं काही दिसलं नाही. कारण दादा यापूर्वीही उपमुख्यमंत्री होते. अजितदादा स्ट्रेट फॉरवर्ड मंत्री आहेत, असंही ते म्हणाले.

आपत्तीच्या प्रसंगी मुख्यमंत्री स्वत: पायी चालत जाऊन पाहणी करतात. दुसरे उपमुख्यमंत्री नियंत्रण कक्षात जाऊन आढावा घेतात तर तिसरे उपमुख्यमंत्री आर्थिक नियोजन करतात. तिघांनीही तत्परता दाखवून मदत केली. आज मी त्यांच्याच सांगण्यावरून इथे आलो आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.