अजित पवार भाजप सोबत येणार नाहीत ही सगळी नौटंकी

0
283

अमरावती, दि. ६ (पीसीबी) : अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा मागच्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात होत आहे. शिवाय भाजपसोबत जात अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याचं बोललं जात आहे. त्यावर भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार भाजप सोबत येणार नाहीत ही सगळी नौटंकी आहे, असं अनिल बोंडे म्हणाले आहेत.

सगळे एकाचेच एकच आहे. अजित पवार काही भाजपसोबत जात नाही. एकदा नाही दोन दोन वेळा हे नाटक झालं आहे.पहाटेच्या शपथविधीलाही झालं. भाजपने केव्हाच म्हटलं नाही की अजितदादा पवार भाजपमध्ये येणार आहे. जनतेमध्ये संभ्रम पसरण्याचं काम राष्ट्रवादी करते. अजित पवार भाजपसोबत येणार नाहीत. ही सगळी नौटंकी आहे, असं अनिल बोंडे म्हणाले आहेत.

शरद पवार यांचा राजीनामा आणि माघार यावरही अनिल बोंडे बोलले आहेत. शरद पवारांनी राजीनामा दिल्यानंतर पहिल्या दिवशी वाटलं होतं की ते त्यांच्या चेले चपट्यांना रडायला लावतील, असं अनिल बोंडे म्हणाले आहेत.

12 कोटी महाराष्ट्रातील जनतेपैकी पाचशे ते सहाशे लोक रडायला लागले. घोषणा द्यायला लागले आणि शेवटी राजीनामा वापस घेतला. ही एक प्रकारची नौटंकीच होती. याची आता किळस यायला लागली आहे. लोकांना सतत त्यांना मूर्ख बनवण्याचं काम केलं गेलं, असं बोंडे यांनी म्हटलं आहे.

कोणत्या सामान्य जनतेने म्हटलं की शरद पवार यांनी राजीनामा देऊ नये. मी फिरत असताना लोक म्हणत होते की, शरद पवार राजीनामा या हाताने देतील आणि त्या हाताने परत घेतील. पवारांबद्दल लोकांच्या मनात विश्वासार्हता राहिलेली नाही. शरद पवारांचा राजीनामा म्हणजे सगळे मिळून केलेली नौटंकी आहे.शरद पवार ,अजित पवार, सुप्रिया सुळे यांनी मिळून केलेली नौटंकी आहे, असा घणाघातही अनिल बोंडे यांनी केला आहे.

एकाने भाजप जवळ जाण्याचा प्रयत्न दाखवायचा. एकाने धर्मनिरपेक्ष पक्षांसोबत असल्याचं दाखवायचं. फक्त स्वतःची संपत्ती, स्वतःचा काळा पैसा वाचवण्यासाठी केलेली ही नौटंकी आहे, अशा शब्दात अनिल बोंडे यांनी शरद पवार यांचा राजीनामा आणि त्यानंतरच्या घटनांवर भाष्य केलंय.