अजित पवार बोलले, 2024 कशाला, आत्ताच मुख्यमंत्री होऊ शकतो…

0
160

चिंचवड, दि.22(पीसीबी) – 2024 साली नाहीतर आत्ताही राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होऊ शकतो, असं वक्तव्य राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार चांगलेच चर्चेत आहेत. पवार भाजपात जाणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम दिल्यानंतर आता पुन्हा एकदा अजित पवारांनी मोठं विधान केलंय. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अजित पवार बोलत होते.

दरम्यान, राष्ट्रवादीकडे आजपर्यंत बहुतांशवेळा उपमुख्यमंत्रिपद राहिलंय, यावर बोलताना त्यांनी राष्ट्रवादीकडेच उपमुख्यमंत्रिपद का राहिल्याची स्पष्टोक्ती दिलीय. पवार म्हणाले, 2004 साली राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होऊ शकत होता. त्यावेळी राष्ट्रवादीला 71 विधानसभेच्या जागा तर काँग्रेसला 69 जागा मिळाल्या होत्या.

मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच होणार असल्याची सर्वच काँग्रेसच्या नेत्यांची मानसिकता होती. मात्र, वरिष्ठांच्या आदेशानूसार राष्ट्रवादीचे आर.आर. पाटील हे उपमुख्यमंत्री झाले होते. त्यावेळी दिल्लीत नेमकं काय घडलं? याबाबत मला माहित नसल्याचं त्यांनी सांगितलं. पण पक्षाच्या शिस्तेसाठी वरिष्ठांचा आदेश पाळावा लागतं असल्याचं ते म्हणाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपदाचं कोणतंही आकर्षण नसून त्यावेळी आर.आर.पाटील मुख्यमंत्री झाले असते, त्यानंतर नेहमीच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष दोन नंबरला राहिला असून त्यांच्या उपमुख्यमंत्रिपद राहिलं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.

दरम्यान, काँग्रेसकडे मुख्यमंत्रिपदासाठी क्लेम करु शकता का? याबद्दल विचारलं असता त्यांनी थेटच उत्तर दिलंय. 2024 ला नाहीतर आत्ताही राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होऊ शकतो, असं ठामपणे सांगितलं आहे. पवारांनी स्पष्ट केल्यानंतर एकच हशा पिकला होता.