युगेंन्द्र पवार विरोधात जय पवार लढत होणार
बारामती , दि. १४ – राज्याच्या राजकारणातील अत्यंत महत्वाची बातमी… अजित पवार यंदा बारामतीतून विधानसभेची निवडणूक लढणार नसल्याची चर्चा होत आहे. अजित पवार यांच्या ऐवजी आता त्यांचे पुत्र जय पवार बारामतीतून विधानसभेची निवडणूक लढणार असल्याची देखील चर्चा होत आहे. शरद पवार गटाकडून बारामतीतून युगेंद्र पवार यांना विधानसभेची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर अजित पवार यांच्या जागेवर जय पवार यांनी विधानसभेची निवडणूक लढली तर नवी राजकीय समिकरणं समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा बारामतीत युगेंद्र पवार विरूद्ध जय पवार अशी लढत होण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीवेळी अजित पवार यांनी जाहीर भाषणात एक विधान केलं होतं. अजित पवार यांचं हेच भाषण सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या भाषणातील अजित पवारांचं वक्तव्य पाहता अजित पवार आता बारामतीतून विधानसभा निवडणूक लढणार नसल्याची चर्चा होत आहे. 16 फेब्रुवारीचं अजित पवार यांचं हे भाषण आहे. लोकसभेला बारामतीतून आपल्या विचारांचा खासदार निवडून दिला नाही. तर मी बारामतीतून विधानसभा निवडणुकीला उभं राहीन. नाती तर तुम्ही जर मला साथच देणार नसाल तर मला माझा संसार आहे. मी निवडणूक लढणार नाही, असं अजित पवार या सभेत म्हणाले होते. त्यांचं हे भाषण सध्या व्हायरल होत आहे.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच पवार कुटुंब एकमेकांच्या विरोधात निवडणुकीत उभं होतं. सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार अशा झालेल्या या लढतीत सुप्रिया सुळे जिंकल्या. मात्र त्यानंतर आता अजित पवार यांच्या जुन्या भाषणाचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अजित पवार यंदाची विधानसभेची निवडणूक लढणार नसल्याचं बोललं जात आहे.
बारामतीत राष्ट्रवादीच्या जन सम्मान रॅलीत उपस्थित असणाऱ्या लोकांच्या आम्ही प्रतिक्रिया जाणून घेतल्या. तर अजित पवार बारामतीतून लढणार नाहीत, ही केवळ चर्चा आहे. यात कोणतंही तथ्य नाही. बारामती म्हणजे अजित पवार अशी ओळख आहे. त्यामुळे अजित दादा असा निर्णय घेणार नाहीत आणि त्यांनी तसा निर्णय घेऊही नये, असं अजित पवार यांच्या समर्थकांनी म्हटलं आहे.