महाराष्ट्र, दि. २९ (पीसीबी) – महायुतीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काही आलबेल नाहीय. भाजपा-शिवसेना हे पक्ष उघडपणे राष्ट्रवादीवर वेळोवेळी तोंडसुख घेत आहेत. शिंदे-फडणवीस जरी अजित पवार गट सोबत असल्याचे दाखवत असले तरी देखील तिन्ही पक्ष एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. आता नुकताच राष्ट्रवादी आणि शिवसेनेत वाद उफाळून आला आहे. याचे पडसाद युतीवर पडण्याची चिन्हे दिसत आहेत.
एकनाथ शिंदे गटाचे धाराशिवचे पालकमंत्री तानाजी सावंत यांनी अजित पवार राष्ट्रवादी गटाबद्दल खळबळजनक वक्तव्य केले आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आपले आयुष्यभर पटले नाही, मांडीला मांडी लावून बसलो आहोत परंतू बाहेर आल्यावर उलट्या होतात, असे वादग्रस्त वक्तव्य तानाजी सावंत यांनी केले आहे.
यावरून राष्ट्रवादी भडकली असून अमोल मिटकरी यांनी महायुतीमध्ये असल्यामुळे त्यांना जर उलट्या होत असतील तर त्या कशामुळे होतात हे एकनाथ शिंदेच सांगू शकतील असे म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी शिंदे गटाचे मंत्री अशा पद्धतीचे बोलणार असतील तर हे ऐकून घेण्यापेक्षा बाहेर पडलेले बरे, अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. महायुती झाली म्हणून आज तानाजी सावंत हे मंत्री झाले आहेत. आम्ही सत्तेसाठी लाचार नाही, राष्ट्रवादी महायुतीत तानाजी सावंतांमुळे आलेली नाही, असेही पाटील म्हणाले.
महत्वाचे म्हणजे उद्धव ठाकरे सरकारमध्ये असताना अजित पवार हे आपल्या आमदारांना निधी देत नाहीत असा आरोप करून एकनाथ शिंदेंनी सत्ता उलथवून टाकत भाजपसोबत सत्ता स्थापन केली होती. परंतू, याच अजित पवारांसोबत सत्ता शेअर करावी लागली आहे. आता सत्ता उपभोगून झाल्यानंतर विधानसभा निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी पुन्हा एकदा अजित पवारांवर टीका केली जाऊ लागली आहे.