अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंसह अनेक आमदार भाजपच्या वाटेवर ?

0
181

येत्या ४ जूननंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे काही आमदारांसह भाजपामध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत, असा दवा शरद पवार गटाचे नेते मेहबूब शेख यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यानंतर विविध राजकीय चर्चांना उधाण आहे. शुक्रवारी माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

“ज्या लोकांचं शरद पवारांवर प्रेम आहे, तीच लोक आता आमच्या पक्षात शिल्लक राहिली आहे. इकडे तिकडे बघणारे आणि दुसऱ्यांच्या घरात डोकावणारे सगळे जण निघून गेले आहेत. त्यामुळे आमच्या पक्षातून आता कुणी बाहेर पडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मात्र, सुनील तटकरे ज्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहे, त्या पक्षाचे बरेच आमदार ४ जूननंतर दुसरीकडे जाण्याच्या तयारीत आहे”, अशी प्रतिक्रिया मेहबूब शेख यांनी दिली आहे.

“सुनील तटकरे गोंधळलेल्या अवस्थेत”
“आमच्याकडे बऱ्याच लोकांचे निरोप यायला लागले आहे. ४ जूननंतर सुनील तटकरे हेदेखील काही आमदारांसह भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. कारण त्यांना माहिती आहे की, आपल्याला शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश मिळणार नाही. त्यामुळे ते गोंधळलेल्या अवस्थेत आहे. त्यातूनच ते अशाप्रकारची विधानं करत आहेत”, असा टोलाही त्यांनी लगावला.

“सुनील तटकरे भाजपामध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत”
“आपले आमदार सोडून जाऊ नये किंवा शरद पवारांकडे जाऊ नये, यासाठी तटकरेंचे प्रयत्न सुरू आहे. खरं तर अजित पवार गटाच्या नेत्यांची काही भाषणं बघितली तर ते लोक पराभवाच्या मानसिकतेत आहेत, हे स्पष्टपणे दिसून येत आहे. अजित पवारांची नाव आता बुडायला लागली आहे. त्यामुळे सुनील तटकरे आता भाजपामध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहे”, असेही ते म्हणाले.