मुंबई, दि. 18 (पीसीबी) : मुंब्राच्या किस्मत कॉलनीत आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नवीन कार्यालयाचे उद्घाटन होत असताना, शरद पवार गटाचे कार्यकर्ते आणि नेते जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांनी विरोध केला. त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घातला. या घटनेमुळे दोन्ही गटातील कार्यकर्ते आमने-सामने आले. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. अजित पवार गटाचे नेते आणि कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार नजीब मुल्ला आणि शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हा संघर्ष झाला. यावेळी अनुचित प्रकार टाळण्यासाठी मुंब्रा पोलीस ठाण्याचे 30 पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी आणि दंगल नियंत्रक पथक घटनास्थळी तैनात करण्यात आले आहेत.
मुंब्राच्या किस्मत कॉलनीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन होणार होते. याचवेळी, शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयासमोर येत घोषणाबाजी करत गोंधळ घातला. शरद पवार गटाच्या कळवा-मुंब्रा विधानसभा अध्यक्ष जावेद शेख यांनी यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. “आमचा कोणताही वाद नव्हता, पण अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना मारण्याचा प्रयत्न केला, आणि यामुळे आम्हाला त्यांचा विरोध करावा लागला”, अशी प्रतिक्रिया जावेद शेख यांनी दिली. तसेच त्यांनी असेही नमूद केले की भारतीय जनता पक्षाशी त्यांचा काहीही संबंध नाही आणि त्यांचा विरोध केवळ अजित पवार गटाच्या वर्तनाला आहे.
दुसरीकडे, अजित पवार गटाचे राष्ट्रीय अल्पसंख्याक सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी आरोप केला की, जितेंद्र आव्हाड यांनी मुंब्राच्या विकासासाठी आलेले पैसे खाल्ले आहेत आणि कोणताही विकास कामे केले नाहीत. त्यांनी सांगितलं की, आगामी विधानसभा निवडणुकीत कळवा-मुंब्रा मतदारसंघातून अजित पवार गट नजिब मुल्ला यांना आव्हाड यांच्या विरोधात उभे करणार आहे. दोन्ही बाजूंनी तणाव वाढल्यानंतर पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात केला असून, सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.