करमाळा, दि. 08 (पीसीबी) : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही. पण तरीही सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे. त्यातच आता विधानसभा निवडणुकांपूर्वीच अजित पवार गटाला गळती लागल्याची चिन्हं दिसत आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाला एकापाठोपाठ एक धक्के मिळत आहेत. त्यातच आता अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख असलेले करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे यांनी एक मोठी घोषणा केली आहे. करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे हे अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. त्यांनी स्वत: याबद्दलची माहिती दिली आहे.
“विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाल्यापासून कार्यकर्त्यांची आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची एकत्र येऊन येणाऱ्या निवडणुकांबद्दलची चर्चा व्हावी. त्यामुळे अनेक आजी-माजी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यासोबत चर्चा झाली. यावेळी एकत्र चर्चा व्हावी, या दृष्टीने संवाद मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्याला अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला. जर राजकारणात टिकायचे असेल तर राजकारण हे जातीवरचं टिकणार नाही. पुण्याईवर टिकणार नाही. राजकारण टिकण्यासाठी विकासाचा दृष्टीकोन असेल तरच ते लाँगटर्म टिकेल. कारण लोक हे एका मुद्द्यावर राहत नाही. त्यांना प्रगती हवी असते. गेल्या ३० वर्षात तुम्ही काय केलं, यावर निवडणुकीत मतदान होते”, असे आमदार संजयमामा शिंदे यांनी म्हटले.
या संवाद मेळाव्याला आमदार बबनराव शिंदे आणि धनराज शिंदे असे शिंदे कुटुंब एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. याबद्दल संजयमामा शिंदेंना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, तुम्ही आता राज्यातलं वातावरण बघताय, आता फक्त नवरा बायकोचा वाद लागायचा राहिला आहे. तो एकदा कुणाचं निघाला की विषय संपला. घरात आपण बघतोय की पिढ्या बदलल्या आहेत. विचारसरणी बदलली आहे. त्यामुळे घरातल्या घरात भांड्याला थोडं भांड लागतं, तो वाद चर्चेतून संपून जातो, असे संजयमामा शिंदे यांनी म्हटले.
“मी अपक्ष निवडणूक लढवणार हे माझ्या नेत्यानेच जाहीर केले. माझे श्रद्धास्थान हे शरद पवार साहेब आहेत, तर माझे नेते अजित पवार आहेत. मग भले मी कोणत्या पक्षात असो किंवा नसो, आमच्या दोघांची विश्वाससार्हता आहे ते एकमेकांना माहिती आहे. मी अपक्ष निवडणूक लढवणार असलो तरीही मी कोणत्या पद्धतीने निवडणूक लढवणार याची त्यांना पूर्ण कल्पना आहे, असेही संजय मामा शिंदे यांनी सांगितले.