पिंपरी, दि. २० – पिंपरी चिंचवड शहरातील सलग २५ वर्षांची एकहाती सत्ता भ्रष्टाचाराच्या किरकोळ मुद्यांवर भाजपने उलथवून टाकल्याने खवळलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता सन २०१७ च्या पराभवाचे उट्टे काढायचे ठरवले आहे. पाच वर्षांची सत्ता आणि तीन वर्षाच्या प्रशासकिय राजवटीत शेकडो कोटींचा भ्रष्टाचार आणि नागरिकांचे असंख्य प्रश्नांना अजितदादांनी हात घातल्याने सत्तेच्या धुंदीत असलेल्या भाजपचे नेत्यांची अक्षरशः भंबेरी उडाली आहे.
आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यानंतर पिंपरी चिंचवडमध्येही अजित पवार यांनी आज सकाळी नऊ वाजले पासून जनता दरबार घेतला. शनिवारी सकाळी या जनता दरबाराला रागा पॅलेस मंगल कार्यालयात सुरुवात झाली. अक्षरशः पाय ठेवायला जागा नव्हती इतकी प्रचंड गर्दी होती. पाणीपुरवठा, बांधकाम परवानगी पासून पोलिस, प्रशासन, म्हाडा, महावितरण, पीएमपी आणि सहकार अशा सर्व मिळून विविध २४ विभागांच्या तब्बल साडेसहा हजार तक्रारी आल्या. सर्व शासकिय अधिकाऱ्यांचा ताफा उपस्थित होता. प्रत्येक प्रश्नाची जागेवर उकल होत असल्याने लोक सुखावल्याचे प्रत्यक्ष पाहणीत आढळले.
महापालिकेच्या शहर विकास आराखड्यातील घोटाळा सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी मांडला आणि दादांनी तत्काळ आयुक्त शेखर सिंह यांना त्याबाबत कठोर शब्दांत निर्देष दिले. माता रमाई स्मारक तसेच शासकिय पातळीवर जयंती साजरी करण्याची मागणी आंबेडकरी चळवळीतील अनेक कार्यकर्त्यांनी मिळून केली त्यालाही तत्काळ होकार दिला. वैयक्तीक पातळीवरच्या अनेक तक्रारींतही त्यांनी स्वतः संबंधीत अधिकाऱ्यांना सांगून लक्ष घातले. इक्साईड बॅटरी कंपनी कामगारांचे तसेच अनेक शिष्टमंडळे थेट पवार यांना भेटली.
या जनता दरबारात आलेल्या एका आजोबांची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. हे आजोबा अजित पवार यांच्याकडे एक तक्रार घेऊन आले होते. त्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या बिनडोक कारभाराबाबत सांगितलेला किस्सा ऐकून उपस्थितांना डोक्यावर हात मारुन घेण्याची वेळ आली.
पिंपरी चिंचवडमधील अजित पवारांच्या जनता दरबारात 79 वर्षीय जनता दलाचे जेष्ठ कार्यकर्ते सुभाष बोधे आले होते. या आजोबांनी पिंपरी चिंचवड पालिकेच्या प्रशासक काळात झालेल्या कारभार मांडला. बोधे कुटुंबियांच्या घरासमोर पालिकेने रस्त्याचे केलेलं काम, त्यातून झालेला त्रास आणि दाद मागितल्यानंतर त्यांना मिळालेली उत्तरं हा सर्व घटनाक्रम आजोबांनी अजित दादांसमोर मांडला. त्यांनी अजित पवारांना सांगितले की, आधी माझ्या घराला समांतर असा रस्ता होता. मात्र, आता रस्ता पाच फूट खाली आणि घर वर झाल्यानं ते गाडी पार्क करु शकत नाहीत. अशात गाडी बदलण्याचा अजब सल्ला पालिकेकडून मिळाला.
अजित पवार यांच्या जनता दरबाराच्यानिमित्ताने पिंपरी-चिंचवडच्या स्थानिक राजकारणात नव्या चर्चा रंगल्या आहेत. पिंपरी चिंचवड शहरवासीयांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी स्वतः पालकमंत्री अजित पवारांनी जनता दरबार घेतलाय. आयएएस, आयपीएस दर्जाचे सगळे अधिकारी मंचावर बसवून म्हणजेच शासकीय यंत्रणेला सोबत घेऊन अजित दादांचा हा कारभार सुरु आहे. लोकांचे सर्व प्रश्न निकाली निघतात, काही प्रश्नांवर दिलासादायक उत्तर मिळते म्हणून लोकांना हायसे वाटले.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर सुरु असलेल्या या जनता दरबारातून अप्रत्यक्षपणे जोरदार प्रचार सुरु झाल्यासारखे आहे. आमदार अण्णा बनसोडे आणि फक्त राष्ट्रवादीचेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित असल्याने कुजबूज सुरू आहे. राष्ट्रवादीच्या पातळीवर हा जनसंवाद होत असल्याने आणि भाजप विरोधातील लोकमत त्यातून एकवटत असल्याने भाजपचे स्थानिक नेते हादरले आहेत. पालकमंत्री म्हणून जर ते हा जनता दरबार घेतायेत, तर फक्त राष्ट्रवादीचे पदाधिकारी इथं उपस्थित का, असाही प्रश्न उपस्थित केला जातो आहे.
दरम्यान, अजित पवार यांच्या विरोधात ब्र शब्द काढायची हिंमत कोणात नसल्याने भाजपच्या चारही आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. भाजपने यावर सोयीस्कररीत्या चुप्पी साधलेली आहे. भाजप आमदार महेश लांडगे यांनी नेहमीप्रमाणे फोन उचलणे टाळले आहे, आमदार शंकर जगताप आणि शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी आम्ही प्रतिक्रिया देणार का, हे कळवतो असे म्हटले. तर आमदार अमित गोरेखेनीं, मी पुण्यात आहे अन शहरात आल्यावर कळवतो, असं उत्तर दिले. कदाचित अजितदादांच्या भीतीपोटी भाजपचे हे नेते बोलणं टाळत असल्याचे एकंदरीत दिसून येत आहे.















































