दि १५ एप्रिल (पीसीबी ) – शिरुर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अत्यंत चुरशीची होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढळराव यांचा प्रचार करताना डॉ. कोल्हेंवर नाव न घेता नटसम्राट म्हणत टीका केली. त्यावर मतदारसंघात अजित पवार यांच्या विधानावर अनेकांनी नाराजी दर्शविली आहे. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे संसदेतील काम उत्तम असल्यामुळे त्याचबरोबर विकासाच्या दृष्टीने डॉ. कोल्हे यांना पाठिंबा मिळत असताना अजित पवार यांना हे रुचलेलं नाही म्हणून अशा प्रकारची विधाने केली जात आहे
दरम्यान खासदार डॉ. अमोल कोल्हे “दूरदर्शन” च्या कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची अधिकृत भूमिका मांडण्यासाठी आज उपस्थित राहिले. पक्षाची भूमिका मांडण्याची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर सोपावल्याने मुंबई येथील दूरदर्शनच्या कार्यालयात डॉ. कोल्हे पोहोचले. त्यानंतर त्यांनी अजित पवार यांच्या टिकेकर अप्रत्यक्ष ट्विटच्या माध्यमातून प्रतिउत्तर दिले आहे. कार्यसम्राट की नटसम्राट माहीत नाही पण स्वकर्तृत्वसम्राट नक्की आहे असं म्हणत अजित पवार यांना प्रतिउत्तर दिले आहे.
कार्यसम्राट की नटसम्राट माहीत नाही पण स्वकर्तृत्वसम्राट नक्की!
२००१ साली “सांगा उत्तर सांगा” या कार्यक्रमाचा निवेदक म्हणून या वास्तूच्या पायऱ्या चढलो ते माझे ‘काका’ अभिनय क्षेत्रात होते म्हणून नाही तर स्वतःच्या टॅलेंट आणि कर्तृत्वाच्या जोरावर.. आणि योगायोगाने आज २०२४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार या राजकीय पक्षाची अधिकृत भूमिका मांडण्यासाठी याच वास्तूच्या पायऱ्या चढलो… ते ही काकांच्या नाही तर ‘स्व’कर्तृत्वाच्या जोरावर…
खासदार डॉ. कोल्हे यांनी अशा प्रकारे ट्विट करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर अप्रत्यक्ष प्रतिहल्ला केला आहे.
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी स्वकर्तुत्व दाखवत महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगभरात छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास पोहचविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. राजकीय क्षेत्रात देखील कोणत्याही आरोपाशिवाय खासदारकीची पहिली टर्म पूर्ण केली. स्वकर्तुत्वाने डॉक्टर, स्वकर्तुत्वाने अभिनेता, आणि स्वकर्तुत्वाने शिरुर लोकसभा मतदारसंघात प्रामाणिक राजकीय चेहरा म्हणून वावरताना एक सुसंस्कारित राजकीय नेता म्हणून खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आपली ओळख निर्माण केली आहे.











































