अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेला सुरुवात

0
65

दि. 8 ऑगस्ट (पीसीबी) – राज्यातील राजकीय पक्षांकडून आता विधानसभेसाठी जय्यत तयारी केली जात आहे. त्यानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने आता जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. आजपासून पक्षाच्या जनसन्मान यात्रेला सुरुवात झाली आहे.

प्रत्येक पक्षाकडे असलेल्या जागा त्यांच्याकडेच राहतील
अजित पवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आहे. महायुतीच्या जागावाटपाबाबत अजित पवार म्हणाले की, आमच्या तीनही पक्षांकडे ज्या ज्या जागा आहेत त्या त्या जागा त्यांच्याकडे ठेवल्या जातील. पण जर काही सिटींग जागा बदलायच्या असतील तर त्याही प्रकारची तयारी आणि मानसिकता तिन्ही पक्षांनी आणि मित्र पक्षांनी ठेवली आहे. आता लवकरच त्याला अंतिम स्वरूप दिलेले आपल्या पाहण्यात येईल, असे त्यांनी म्हटले आहे.

विरोधकांना जे योग्य वाटते ते त्यांनी करावे
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिक ते दिंडोरी असा बसमधून प्रवास करत असताना एएनआयशी संवाद साधला आहे. ते म्हणाले, सरकारने जाहीर केलेल्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यानिमित्त आम्ही जास्तीत जास्त मतदारसंघांत जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसेच विरोधकांना जे योग्य वाटते ते त्यांनी करावे, आम्हाला जे योग्य वाटते ते आम्ही करत करणार”, असे अजितदादा म्हणाले.

विरोधकांकडून भूमिका मांडली जाते
याशिवाय आरक्षणाबाबत बोलताना ते म्हणाले, विरोधकांकडून भूमिका मांडली जाते. त्याबद्दल विरोध असण्याचा कारण नाही. आम्हीही आमचे म्हणणे मांडत असतो. वेळोवेळी निर्णय घेतले गेले. मात्र कोर्टात ते निर्णय टिकले नाही अशा घटना घडल्या आहेत. त्यामुळे आरक्षण देताना इतरांची नाराजी राहू नये यासाठी आम्ही काम करत आहोत, आम्हाला कोणावरही अन्याय करायचा नाही. सर्व घटकांना आम्हाला पुढे घेऊन जायचे आहे. छत्रपती शिवरायांनीही सर्व जातींना सोबत घेऊनच हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती. तोच विचार आम्ही पुढे नेत आहोत”, असे अजित पवार म्हणाले.

खास गीत प्रदर्शित
दरम्यान, यात्रेनिमित्त अजित पवार गटाकडून एक गीत प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. जन सन्मान-दादांचा वादा. ज्याच्या भावना आता या राष्ट्रवादी गीताच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात गुंजतील असे कॅप्शन ट्विटवर हे गीत पोस्ट करत देण्यात आले आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यासह सगळे मंत्री, आमदार, पदाधिकार्यांच्या उपस्थितीत दिंडोरीतून या यात्रेची सुरुवात होणार आहे.