अजित पवारांची राष्ट्रवादी ६० जागा लढवणार, पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय

0
117

मुंबई, दि. ३० (पीसीबी) : विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. अशात जागावाटपांच्या चर्चांना उधाण आलं आहे. कोणता पक्ष किती जागांवर निवडणूक लढणार? याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राष्ट्रवादी किती जागांवर लढणार याचा आकडा सांगितला आहे. आपल्याकडे असणाऱ्या 54 जागांवर तर आपण लढायचं आहेच पण एकूण 60 जागांवर आपल्याला काम करायचंय, असं अजित पवार यांनी सांगितलं आहे. मुंबईत काल संध्याकाळी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत अजित पवारांनी हे सूचक विधान केलं आहे.

कोण- कोण अजित पवारांच्या संपर्कात?
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेकजण पक्षांतर करण्याची शक्यता आहे. अशातच अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षात अनेकजण प्रवेश करणार असल्याचा दावा केला आहे. मुंबईतील वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार झिशान सिद्दिकी, नाशिकच्या इगतपुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार हिरामण खोसकर, अमरावती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सुलभा खोडके हे काँग्रेसचे आमदार आपल्यासोबतच आहेत, असं अजित पवार म्हणाले. त्यामुळे काँग्रेसचे तीन आमदार राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याचं आता निश्चित झालं आहे.

पक्षप्रवेश कधी?
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, अमरावती जिल्ह्यातील वरूड- मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयार, राष्ट्रवादी करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे हे देखील आपल्यासोबत असल्याचा दावा अजित पवारांनी केला आहे. त्यामुळे आता मागच्या काही दिवसांपासून या नेत्यांच्या पक्षप्रवेशाची दबक्या आवाजात चर्चा सुरु होती. पण अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा दावा केल्याने या नेत्यांचा पक्षप्रवेश निश्चित झाला आहे. आता प्रत्यक्षपणे पक्षप्रवेश कधी होतो, हे पाहावं लागणार आहे.

विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. अजित पवारांकडे 54 आमदार आहेत. त्यापलिकडे विरोधी पक्षातील काही नेते त्यांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे अजित पवार 60 जागा लढण्यावर दावा करत आहेत. आता महायुतीच्या जागावाटपात त्याचा हा दावा मान्य केला जाणार का? हे पाहावं लागणार आहे. तर दुसरीकडे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार ‘जनसन्मान यात्रा’ करत आहेत. या गुलाबी थीम असणारी ही यात्रा सध्या राज्यभरात चर्चेत आहे. त्यामुळे लोकसभेचा आलेला अनुभव पाहता या विधानसभेसाठी अजित पवार पूर्ण तयारीत असल्याचं दिसतंय.