मुंबई, दि. २१ (पीसीबी) – दोन दिवसांपूर्वीच अजित पवार हे भाजपात जातील अशा चर्चांना उधाण आलं होतं. यावर सविस्तर पत्रकार परिषद घेत मी कुठेही जाणार नाही राष्ट्रवादीतच राहणार असं अजित पवार यांनी सांगितलं होतं. मात्र आता यानंतरही विविध चर्चांना उधाण आलं आहे. तसंच संजय राऊत विरूद्ध अजितदादा असा सामनाही राज्यात रंगलेला पाहण्यास मिळतो आहे. अशात भाजपा खासदार अनिल बोंडेंनी एक मोठा दावा केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
“संजय राऊत यांच्याबद्दल सगळ्यांनाच माहित आहे. शिवसेनेतले ४० आमदार फुटले ते संजय राऊत यांच्यामुळेच. अजित पवारही संजय राऊत यांना कंटाळून महाविकास आघाडी सोडतील. शिवसेना फोडण्यासाठी जसे राऊत जबाबदार आहेत तसंच महाविकास आघाडी फोडण्यासाठीही संजय राऊतच जबाबदार ठरतील. संजय राऊत यांच्या म्हणण्यानुसार शरद पवार यांच्या सांगण्यावरूनच अजित पवार यांना संजय राऊत महाविकास आघाडीतून बाहेर काढतील. आधी चाळीस आमदारांना बाहेर काढलं आता अजित पवारांनाही बरोबर आयडियाने बाहेर काढलं जाईल. संजय राऊत हे जसं सांगितलं आहे तसंच वागत आहेत. ते परवा म्हणालेही ना.. मी फक्त मोठ्या साहेबांचंच ऐकतो. आधी शरद पवारांच्या सल्ल्याने शिवसेना फोडली आता महाविकास आघाडी फोडतील. हे सगळं नियोजनबद्ध पद्धतीने चाललं आहे. महाराष्ट्रातल्या जनतेची करमणूक होते आहे” असं अनिल बोंडेंनी म्हटलं आहे. भाजपा खासदार अनिल बोंडेंच्या या दाव्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
भाजपाचे खासदार अनिल बोंडे यांनी माध्यमांशी बोलताना हा दावा केला आहे. संजय राऊत यांच्या म्हणण्यानुसार ते शरद पवार यांच्या सांगण्यावरूनच अजित पवारांनना महाविकास आघाडीतून बाहेर काढतील असं बोंडे यांनी म्हटलं आहे. याबाबत आता संजय राऊत किंवा अजित पवार काही बोलणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
घाटकोपर येथे एनसीपी कार्यकर्त्यांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात आलं आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार संबोधित करणार आहेत. याप्रसंगी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, अनिल देशमुख आणि आदिती तटकरे उपस्थित राहणार आहेत. मात्र कार्यक्रमाला हजर राहणाऱ्या नेत्यांच्या यादीत अजित पवार यांचं नाव नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.