अजित दादा म्हणाले,विश्वासराव,तुकोबांचा आणि तुमचा संबंध कसा?

0
1

दि.०६(पीसीबी)-महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री, पिंपरी- चिंचवडचे शिल्पकार अजितदादा पवार हे नुकतेच अनंतात विलीन झाले. खऱ्या अर्थाने पुण्याचे आणि महाराष्ट्राचे दादा असणारे अजित पवार हे लोकनेतेच होते, हे ढळढळीत सत्य आहे. त्यांच्याविषयीच्या अनेक आठवणी आहेत. त्यापैकी नेतृत्व, कर्तृत्व आणि व्यक्तिमत्व याविषयीच्या काही आठवणी सांगावशा वाटतात.

नेते आणि पत्रकार यांचे नाते अत्यंत जवळचे असते. नाते जपणारा हा नेता होता, अर्थात पत्रकारांशी नाही. गेली तीस वर्ष मी पिंपरी- चिंचवड आणि पुण्याचे राजकारण, समाजकारण मी अगदी जवळून पाहतोय. मात्र, दादांची पत्रकारांशी फारशी जवळीक नव्हती. (प्रा रामकृष्ण मोरे सर यांच्याएवढी) हे वास्तवच आहे. मात्र, पक्ष फुटल्यानंतर त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये अमुलाग्र बदल झाल्याचे दिसून येते. वरकरणी फटकळ वाटणारे दादा गोड स्वभावाचे, मिस्कील होऊ लागल्याचे दिसून आले.

पिंपरी- चिंचवडच्या राजकारण, विकासावर अजित दादांची मोहोर स्पष्टपणे दिसून येते, अर्थात त्यांनी अनेक सामान्य कार्यकर्त्यांना बळ दिले. मोठे केले. कर्तुत्व नसणाऱ्या अनेकांना नगरसेवक, महापौर, स्थायी समिती सभापती, आमदार, खासदारही केले. मात्र, ज्यावेळेस देण्याची वेळ आली. त्यावेळेस स्वार्थासाठी अनेकांनी दादांची साथ सोडली. याचे शल्य त्यांना २०१७ पासून शेवटच्या क्षणांपर्यंत असल्याचे दिसून आले. असो, खरे तर, दादांविषयीच्या अनेक आठवणी आहेत. त्यापैकी काही महत्त्वाच्या आठवणी…

परखड, थेट, संयमी आणि ‘बोले तैसा चाले…’ असे हे व्यक्तिमत्व अलीकडच्या कालखंडामध्ये मिस्कील आणि कनवाळू बनले होते. मात्र, हे व्यक्तिमत्व आता उजळून निघाले होते. एखाद्या घटनेचा दुसऱ्या बाजूने विचार करण्याचा दृष्टिकोन त्यांच्यामध्येही अधिक ठळकपणे दिसून आला. अर्थात, वयाने ही परिपक्वता येतेच वाटते. पुण्याच्या परिघावर अजित पवार पदोपदी दिसून येतात. २००९ ची घटना. निवडणुकीच्या अनुषंगाने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहामध्ये अजित दादांचे भाषण झाले. दिवसभरामध्ये पाच ठिकाणी दादांनी सुमारे एक- एक तास अशी भाषणे दिली होती आणि प्रत्येक भाषणात वीज, रस्ते, पाणी, पिंपरी- चिंचवडचा विकास असे तेच-तेच मुद्दे… म्हणून मी बातमी दिली आणि त्यात ‘अजित पवारांचे आख्यान’ अशी चौकट केली. दुसऱ्याच दिवशी साडेसातच्या सुमारास फोन आला.

हॅलो, अजित पवार बोलतोय.
विश्वास मोरे बोलताय का? त्यावर मी हो म्हटले. समोरून दादा म्हणाले, ‘अरे हे आख्यान काय असतं.’ त्यावर मी त्यांना आख्यान आणि व्याख्यान कशाला म्हणतात, हे सांगितलं. त्यावर दादा म्हणाले, ‘आपण विकास केला आहे, मग, तो सातत्याने सांगितला. त्यात वावगे काय ?’ त्यावर मी त्यांना म्हणलो, ‘दादा तुमचे म्हणणे बरोबर. दादा, तुम्ही तुमचं काम करताय आणि आमचं काम करतो. त्यामुळे माध्यम काय म्हणतील, याकडे लक्ष देऊ नका.’ त्यानंतर दादा ठीक आहे,असं म्हटले. संवाद थांबला. अर्थात माझं म्हणणं त्यांना पटलं असावं!

2)आणि आयुक्तांनाही झापले!
डॉ. श्रीकर परदेशी हे महापालिकेचे आयुक्त असताना, त्यांनी मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकाम विरोधी मोहीम सुरू केली होती आणि त्याचा धसका पिंपरी चिंचवड शहरातील नेत्यांनी घेतला होता. पीएमआरडीच्या नवीन इमारतीमध्ये अजित पवार आले होते आणि त्यावेळी शहरातील राष्ट्रवादीचे नगरसेवक मुख्याधिकाऱ्यांच्या केबिनमध्येच दादांकडे तक्रार करीत होते. त्यावेळी आयुक्तही आणि इतर अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते. तक्रारीमुळे दादांचा पारा चढलेला होता आणि त्यांनी त्यांच्या शैलीमध्ये झाडायला सुरुवात केली होती. ‘तुम्हाला कळतं का? नगरसेवकांना सगळं भोगाव लागते. (अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले होते. एकेरी भाषेत, उद्धार सुरु होता. दादा स्टाईलने…) तेवढ्यात पत्रकार असल्याचे शहराध्यक्षांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर दादांनी टोनच बदलला. दुसऱ्याच दिवशी ‘अनधिकृत बांधकामांवरून खरडपट्टी’ अशी बातमी प्रसिद्ध झाली. त्यात दादांनी अधिकाऱ्यांचा उद्धार केल्याचे आणि अन्य वास्तववादी मुद्दे होते. त्यावेळीही सकाळी सात-साडेसातलाच दादांचा फोन आला. ‘काय बातमी देता रे…’ पिंपरी चिंचवड शहराविषयी, लोकांविषयी तुम्हाला काही वाटते कि नाही. लोकांसाठी आम्ही बोलतो, प्रशासन एककलमी काम करत असेल, तर त्यांना बोलायचं नाही का? असे ते तावातावानं बोलत होते. त्यावर मी त्यांना बोललो, दादा ‘तुमची भूमिका बरोबर आहे आणि आमचीही भूमिका बरोबर आहे. अधिकाऱ्यांना झापायलच पाहिजे. इतर अधिकाऱ्यांनाही त्याचा मॅसेज जायला हवा. म्हणून माध्यमे बातमी देतात. झापायला हवे पण ते आमच्या समोर नको.’ त्यावर दादा हसले आणि फोन ठेवला.

3) ”विश्वासराव, तुकोबांचा आणि तुमचा संबंध कसा?”
गेल्या तीस-पस्तीस वर्षाच्या पत्रकारितेमध्ये काम करत असताना अजितदादांनी कधीही पत्रकारांशी संवाद किंवा चहापाणी केल्याचे ऐकिवात नाही. केवळ पत्रकार परिषद घेऊन किंवा सभा-समारंभ कार्यक्रमांमध्ये भाषण देण्यापलीकडे त्यांचा पत्रकारांशी संवाद झालेला नव्हता. मात्र, राष्ट्रवादी फुटल्यानंतर त्यांचे व्यक्तीमत्व बदलले होते. महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने पहिल्यांदा त्यांनी पत्रकारांशी संवाद करण्याचे ठरवले आणि सकाळी सातलाच कलासागरला बोलवले. त्यावेळीही दादांनी विविध विषयांवर अत्यंत मिश्किलपणे, संयंतपणे उत्तरे दिली. पत्रकारांनी त्यांना अनेक मुद्द्यांवरून घेरण्याचा प्रयत्न केला. बोलते करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी कुठेही आपला संयम ढळू न देता भूमिका मांडली आणि हे नातं असंच कायम ठेवून असं अभिवचन दिले. त्यानंतर मी त्यांना ‘पाउले तुकोबांची’ हा ग्रंथ भेट दिला. त्यावेळी भोसरीचे आमदार विलास लांडे यांनी माझी ओळख करून दिली.

‘मोरे आणि तुकाराम’ असे दोन संदर्भ असल्याने दादांनी थेटपणे मला विचारले, रामकृष्ण मोरे आणि देहूचे तुमचे नाते काय?’ त्यावर मी त्यांना म्हणालो, ‘दादा आम्ही तुकोबांचे पाईक. भावकी. तुकारामांशी माझे नाते बालपणापासून आहे. मी वारकरी संप्रदायातला आहे आणि संत साहित्य हा माझा आवडता विषय आहे.’ त्यावर विलास लांडे यांनी दादांना सांगितले की, ‘मी संत साहित्यावर पीएचडी केली आहे.’ त्यावर दादांनी पुस्तक घेऊन चाळायला सुरुवात केली. काय आहे पुस्तकात? असे विचारले. त्यावर मी त्यांना ‘व्यक्ती, समाजामनावर संत तुकाराम यांच्या अभंगाचे प्रतिबिंब कसे उमटले आहे. याची माहिती दिली आहे.

अच्युत पालवांचं मुखपृष्ठ पाहून ‘अरे वा… किती छान, मुखपृष्ठ आणि मांडणीही सुरेख आहे, असे दादा म्हणाले. त्यामध्ये त्यांना डॉ अब्दुल कलाम, महात्मा गांधी यांची छायाचित्र दिसली. त्यावर ते म्हणाले, ‘यांचा आणि तुकोबांचा संबंध काय?’ त्यावर मी त्यांना काही संदर्भ सांगितले. ‘अरे वा… खूपच छान!’ हे वेगळं तुकाराम दर्शन आहे असे म्हणत त्यांना कौतुक केलं आणि हे पुस्तक त्यांनी शेजारीच उभे स्वीय सहाय्यकांच्या हातात दिले. आज सायंकाळी मला हे पुस्तक हातात द्या, मला वाचायचं आहे, अशी सूचना केली आणि पुस्तकासाठी काही मदत लागणार असल्यास थेटपणे मला सांगा?, असं आपुलकीने दादांनी म्हणाले. अरे आमचा एक फोटो घ्या रे? असे म्हणत पुस्तकाबरोबर माझाही फोटो घेतला आणि ते पुढील कामाला मार्गस्थ झाले.
जनतेशी नाळ असणारे, सामान्यांच्या प्रश्नांची जाणीव असणारा लोकनेता आपल्यातून निघून गेला. दादांची ही अकाली एक्झिट ही कार्यकर्त्यांसाठी नव्हे तर महाराष्ट्रासाठी ही दुर्दैवाची आहे,
लोकनेत्यास विनम्र अभिवादन.
असा दादा होणे नाही…!
@डॉ विश्वास मोरे, संत आणि लोक साहित्याचे अभ्यासक.