अजित गव्हाणे यांच्या विजयासाठी रणरागिनींची ‘महाआघाडी’

0
72

-रुपीनगर, तळवडे येथील महिला शक्तीने निवडणूक घेतली हाती

  • प्रचंड प्रतिसादात अजित गव्हाणे यांचे रुपीनगर तळवडे मध्ये स्वागत

-महिला भगिनींच्या सुरक्षा आरोग्य आणि शिक्षणावर विशेष भर -अजित गव्हाणे

भोसरी, दि. ०८ (पीसीबी)
भोसरी विधानसभा मतदारसंघाचे मैदान मारण्यासाठी रुपीनगर तळवडे भागातील रणरागिनींची “महाआघाडी” मैदानात उतरली. महिलांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे ही निवडणूक आता महिला शक्तीने जणू हाती घेतली आहे असे चित्र दिसत होते. भगवे फेटे परिधान केलेल्या रणरागिणी जणू भोसरी विधानसभेच्या रणांगणात युद्धासाठी सज्ज असल्याचे भासत होते . राम कृष्ण हरी, वाजवा तुतारी असे म्हणत या रणरागिनींनी नागरिकांना येत्या 20 नोव्हेंबर रोजी अजित गव्हाणे यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.

महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ रूपीनगर तळवडे भागामध्ये गुरुवारी बाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. मात्र महिला भगिनींचा पाठिंबा विशेष नोंद घेण्यासारखा होता. रुपीनगर शिवसेनेच्या कार्यालयामध्ये या महिला भगिनींकडून अजित गव्हाणे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. या रॅलीमध्ये नुकतेच पक्षात प्रवेश केलेले सारिका लांडगे आणि संतोष लांडगे यांची उपस्थिती लक्ष वेधून घेत होती.

ढोल ताशांचा गजर, तुतारीचा निनाद, फटाक्यांची आतिषबाजी आणि फुलांच्या पायघड्या अशा स्वरूपात अजित गव्हाणे यांना विजयाचे औक्षण करण्यात आले. यावेळी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना तसेच काँग्रेसच्या कार्यकर्ते उपस्थित होते.या सर्वांनी अजित गव्हाणे यांच्या विजयाचा संकल्प येथे व्यक्त केला.

सुरक्षा, आरोग्य आणि शिक्षणासाठी विशेष प्राधान्य

रुपीनगर तळवडे येथील नागरिकांचा प्रतिसाद न भूतो न भविष्यती असा होता. भोसरी मतदारसंघांमध्ये परिवर्तनाचा जो संघर्ष उभा केला आहे त्या संघर्षाला नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. यातून मतदारसंघातील दहा वर्षांची खदखद बाहेर पडणार आहे असा विश्वास अजित गव्हाणे यांनी व्यक्त केला. माझ्या विजयामध्ये या माय माऊलींचा मोठा वाटा असणार आहे. त्यामुळे भविष्यात त्यांच्यासाठी सुरक्षा ,आरोग्य आणि शिक्षण यावर विशेष लक्ष देणार असल्याचे अजित गव्हाणे यांनी नमूद केले.